Pune District : पेरणे बंधाऱ्याची दुरुस्ती अंतिम टप्प्यात
Pune District : मागील वर्षी पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे या बंधाऱ्याचा भराव वाहून गेला होता. परिणामी बंधाऱ्याला मोठे भगदाड पडून पाणी साठवणुकीवर परिणाम झाला होता. या गंभीर परिस्थितीकडे दैनिक प्रभातने सर्वप्रथम लक्ष वेधत वृत्त प्रसिद्ध केले होते.

लोणीकंद : पेरणे आणि कोरेगाव भीमा या दोन गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पेरणे-कोरेगाव भीमा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम आता पूर्णत्वाच्या दिशेने आहे. मागील वर्षी पावसाळ्यात बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले होते. त्यामुळे बंधाऱ्याच्या सुरक्षिततेचा तसेच दोन्ही गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अखेर लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश येत असून, काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या दुरुस्तीच्या कामाने आता वेग घेतला आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे या बंधाऱ्याचा भराव वाहून गेला होता. परिणामी बंधाऱ्याला मोठे भगदाड पडून पाणी साठवणुकीवर परिणाम झाला होता. या गंभीर परिस्थितीकडे दैनिक प्रभातने सर्वप्रथम लक्ष वेधत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतरही बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी दैनिक प्रभातच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. बंधाऱ्याची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणीही सातत्याने मांडण्यात आली होती.
आमदार ज्ञानेश्वर कटके, जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्या कोमल ढेरंगे, पेरणेच्या सरपंच उषा वाळके, कोरेगाव भीमाचे माजी सरपंच संदीप ढेरंगे यांच्या माध्यमातून संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून, सध्या काम प्रगतिपथावर आहे. सध्या पेरणे गावच्या बाजूने सुमारे ४० मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर कोरेगाव भीमाच्या बाजूने सुमारे १७ मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
दरम्यान, सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक सत्यनारायण ढेरंगे, पेरणे ग्रामपंचायत सदस्य दिनेश वाळके, शिरूर-हवेली प्रासादिक दिंडीचे सचिव विवेक ढेरंगे, सामाजिक कार्यकर्ते सुनील ढेरंगे, बाळासाहेब नानगुडे, अमोल वाळके, ऋषिकेश बेंडभर, योगेश मांजिरे यांनी पाहणी केली. संबंधित विभागाचे अधिकारी तनपुरे साहेब यांनी सुरू असलेल्या कामाची तसेच पुढील नियोजनाची माहिती उपस्थितांना दिली.
पाणी साठवणुकीचा प्रश्न सुटणार
भरावाची दुरुस्ती आणि दोन्ही बाजूंच्या संरक्षक भिंतींच्या कामामुळे बंधाऱ्याची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे. या बंधाऱ्यामुळे नदी काठच्या गावांतील नागरिकांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे बंधाऱ्याला भगदाड पडल्यानंतर दोन्ही गावांतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता दुरुस्तीचे काम मार्गी लागत असल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून उर्वरित कामही निर्धारित वेळेत पूर्ण झाल्यास आगामी काळात पाणी साठवणुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.





