रेणुका फुंदे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

सातारा: आई-वडिलांच्या निधनानंतर खचून न जाता कठीण परिस्थितीचा सामना करत शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र पोलीस सेवेत रुजू होऊन देशसेवा करत असल्याबद्दल महिला पोलिस शिपाई रेणुका फुंदे (सानप) यांना जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कला, पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती महाराष्ट्र, मोकळा श्वास सामाजिक विकास संस्था सातारा, आयोजित राष्ट्रीय एकता सामाजिक लोकगौरव परिषदेने मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह प्रदान करून फुंदे यांचा गौरव केला.
रेणुका फुंदे यांचा संघर्षमयी प्रवास –
रेणुका फुंदे या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भुतेटाकळी गावच्या आहेत. 3री ईयत्तेत शिकत असताना आजारपणामुळे रेणुका यांच्या आईचे निधन झाले. 10 वीत असताना आजारपणामुळे वडिलांचेही निधन झाले. लहान भाऊ गणेश आणि रेणुका पोरक्या झाल्या. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आजी-आजोबा यांनी त्यांचा सांभाळ केला. शेतात रोजंदारीचे काम करत 11 वी ते बी.एड. पर्यंतचे शिक्षण पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात कॉलेज संस्थापक व शिक्षकांच्या सहकार्याने पूर्ण केले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात एम.ए. हिंदी केले. 2014 साली त्या पोलिस सेवेत रुजू झाल्या. सध्या पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. रेणुका यांचा लहान भाऊ गणेश देखील मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे. अनाथ मुले-मुलींसाठी रेणुका आणि गणेश यांचा संघर्षमयी जीवनप्रवास प्रेरणादायी ठरत आहे.







