WF50 Sports Awards : भारताचा आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर डंका; शब्बीर अली, यासीन मर्चंट यांचा गौरव, ज्युरी पॅनेलमध्येही भारतीय प्रतिनिधीची छाप
WF50 Sports Awards : लंडन येथे आयोजित डब्ल्यूएफ५० स्पोर्ट्स अवॉर्ड्स २०२६ मध्ये भारतीय फुटबॉल प्रशिक्षक शब्बीर अली हबीब विरजी यांना दोन पुरस्कार मिळाले. स्नूकरचे दिग्गज यासिन मर्चंट यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

India Shines at WF50 Sports Awards 2026 in London : ब्रिटनची राजधानी लंडन येथे १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या ‘WF50 स्पोर्ट्स अवॉर्ड्स २०२६’ सोहळ्यात भारताने आपली ऐतिहासिक उपस्थिती नोंदवत तीन प्रमुख पुरस्कार पटकावले. ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ खोजा शिया इथना-अशरी मुस्लिम कम्युनिटीज’च्या (KSIMC) सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या विशेष औचित्यावर हा जागतिक क्रीडा सोहळा आयोजित करण्यात आला होता. जगभरातील सर्वोत्तम खेळाडू, नामवंत प्रशिक्षक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंना त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्यात आले.
फुटबॉल प्रशिक्षक शब्बीर अली हबीब विरजी यांना दोन पुरस्कार –
भारतीय फुटबॉल क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि माजी कर्णधार शब्बीर अली हबीब विरजी यांना त्यांच्या क्रीडा व प्रशिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये गौरविण्यात आले. भारतीय फुटबॉलला नवी दिशा देणे, तरुण खेळाडूंना घडवणे आणि मैदानावर दाखवलेली निष्ठा यासाठी त्यांचा हा विशेष बहुमान झाला. त्यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनामुळे अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावले असून, त्यांच्या या योगदानाची जागतिक मंचावर दखल घेण्यात आली.
स्नूकरचे महामेरू यासीन मर्चंट यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ –
भारताचे विख्यात स्नूकरपटू यासीन मर्चंट यांना क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल अत्यंत मानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ (Lifetime Achievement Award) प्रदान करण्यात आला. अनेक दशकांपासून स्नूकर आणि बिलियर्ड्समध्ये भारताला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणाऱ्या मर्चंट यांनी देशातील अनेक पिढ्यांना या खेळाकडे वळण्यासाठी प्रेरित केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ, सातत्यपूर्ण आणि गौरवशाली क्रीडा प्रवासाचा सन्मान करत जागतिक मंचावर त्यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय ज्युरी मंडळात भारताचे शुजा अली यांचे नेतृत्व –
केवळ पुरस्कार विजेत्यांमध्येच नव्हे, तर या पुरस्कारांच्या अंतिम निवड प्रक्रियेतही भारताचा दबदबा पाहायला मिळाला. क्रीडा आणि मीडिया विश्वातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व शुजा अली यांनी या प्रतिष्ठित पाच सदस्यीय आंतरराष्ट्रीय ज्युरी मंडळात भारताचे प्रतिनिधित्व केले. संपूर्ण आशिया खंडाचे प्रतिनिधित्व करताना शुजा अली यांनी जगभरातून आलेल्या शेकडो नामांकनांचे अत्यंत निष्पक्ष आणि सखोल मूल्यमापन केले. त्यांच्या सहभागामुळे जागतिक निर्णय प्रक्रियेत भारतीय क्रीडा तज्ज्ञांची पत अधिक उंचावली आहे.





