Mumbai News : लोककलेच्या समृद्ध परंपरेतील ‘मानाचं पान’ हरपलं; ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे निधन
Mumbai News : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेला आपल्या नजाकती आणि अदाकारीने वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे मंगळवारी निधन झाले.

Mumbai News : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेला आपल्या कलेने वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे मंगळवारी (22 सप्टेंबर 2026) निधन झाले. त्या 66 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि लोककला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. (Mumbai News)
शकुंतलाताई नगरकर यांनी आपल्या भारदस्त आवाजासोबतच प्रभावी अभिनय, नखरा, अदाकारी आणि भावभावनांच्या माध्यमातून लावणीला वेगळी उंची मिळवून दिली. अनेक दशकं त्यांनी आपल्या कलेने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. (Mumbai News)
आईकडून मिळाला लावणीचा वारसा
शकुंतलाताईंचा जन्म 1960 मध्ये अहिल्यानगर येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आई छबूबाई नगरकर या स्वतः लावणी नृत्यांगना होत्या. त्यामुळे लावणीची कला त्यांना कुटुंबातूनच मिळाली. लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या शकुंतलाताईंनी विविध बालनृत्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. (Mumbai News)
अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी कलाक्षेत्रात पाऊल ठेवलं. आईने त्यांना लावणीसह नृत्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी कथक गुरू गोविंदराव निकम यांच्याकडे पाठवलं. पुढे त्यांनी पारंपरिक संगीतबारी लावणीची स्वतःची स्वतंत्र शैली विकसित केली. (Mumbai News)
‘हनुमान थिएटर’पासून सुरू झाला कलाप्रवास
1974 मध्ये लालबाग येथील प्रसिद्ध हनुमान थिएटरमधून त्यांच्या लावणी कलेला मोठं व्यासपीठ मिळालं. भारदस्त आवाज, प्रभावी अदाकारी आणि सादरीकरणातील भावभावना यामुळे त्या अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरल्या. (Mumbai News)
पारंपरिक लावणीची ओळख कायम ठेवतानाच त्यांनी ‘लावणी के रंग’ आणि ‘लव्ह अँड लावणी’ यांसारख्या कार्यक्रमांमधून आधुनिक प्रयोगही केले. त्यामुळे पारंपरिक लावणीला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला. (Mumbai News)
विविध पुरस्कारांनी गौरव
दीर्घकाळाच्या कलासाधनेची दखल घेत शकुंतलाताई नगरकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राज्य सरकारचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार, नाट्य गौरव पुरस्कार आणि मुंबई महापौर पुरस्कार यांसारख्या सन्मानांनीही त्यांचा गौरव झाला. (Mumbai News)
लावणीच्या पारंपरिक शैलीला आधुनिक प्रयोगांची जोड देत ती अधिक व्यापक रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या शकुंतलाताई नगरकर यांच्या निधनाने लोककला क्षेत्रातील एक महत्त्वाचं पर्व संपलं आहे. त्यांच्या कलासाधनेचा आणि लावणी कलेतील योगदानाचा ठसा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात कायम राहणार आहे. (Mumbai News)
Mumbai News : तटरक्षक दलाची मोठी कारवाई ! डिझेल तस्करी करणाऱ्या संशयित जहाजाला पकडलं





