“योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा,” अनिल परबांची मागणी

Yogesh Kadam And Anil Parab | कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला. याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली आहे. नुकतेच पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी योगेश कदमांनी कशाप्रकारे नियम डावलून सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला, याबाबतची माहिती उघडून सांगितली आहे.
अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, “गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुंडाचा भाऊ असलेल्या व्यक्तीला अधिकृत शस्त्र परवाना दिला. पोलिसांनी हा परवाना नाकारला. पोलिसांनी त्यांचे काम चोख केले होते. परंतु योगेश कदमांनी पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश रद्द केले. पुणे जिल्ह्यात ७० टोळ्या सक्रीय आहेत. निलेश घायावळचा भाऊ सचिन घायावळ याच्यावर खंडणी, खूनासारखे गंभीर गुन्हे आहेत. पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता सचिन घायावळ याला शस्त्र परवाना नाकारला परंतु गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्र लिहून हा शस्त्र परवाना मिळवून दिला. योगेश कदमांनी कुठल्या मोबदल्यात त्याला शस्त्र परवाना मिळवून दिला?” असा सवाल अनिल परब यांनी केला.
विरोधी पक्ष म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू
“गँगस्टरच्या हातात अधिकृत शस्र परवाना देण्याचं काम गृह राज्यमंत्री करतायेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेमकी अडचण काय? अशा मंत्र्यांना सोबत घेऊन स्वत:ची प्रतिमा मलिन का करतायेत हे कळत नाही. योगेश कदम यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. अधिवेशनात आम्ही आवाज उचलू मात्र योगेश कदम यांची हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. लोकांच्या सुरक्षेची सरकारला काही पडली नसेल परंतु विरोधी पक्ष म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा आमदार अनिल परब यांनी दिला आहे.
राज्य सरकारमधील हे मंत्री आईच्या नावाने डान्सबार चालवतायत, मुली नाचवून हे लोक भाडं खात आहेत, गँगस्टर लोकांना पोसत आहेत. हे मंत्री गुंडांना अधिकृत शस्त्र परवाना देत आहेत. हे मंत्री दररोज मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची काय अडचण आहे की, ते अशा मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून का बसले आहेत?, असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला.
योगेश कदम यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते, त्यामुळे त्यांना शस्त्र परवाना देण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ट्विटद्वारे केले आहे.
दरम्यान, निलेश घायावळ आणि सचिन घायावळ खूनाच्या प्रकरणात एकत्र होते. अशा गुंडांना तुम्ही शस्त्रे परवाने देताय त्यातून तुमची सुटका होऊ शकत नाही, असा इशारा देखील अनिल परब यांनी योगेश कदम यांना दिला.
हेही वाचा:
“प्रत्येक घरासाठी एक सरकारी नोकरी..” ; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादवांची मोठी घोषणा





