रामदास कदम यांच्या खळबळजनक आरोपांवर अनिल परब यांचा मोठा खुलासा म्हणाले ” बाळासाहेबांचं मृत्यूपत्र…”

Anil Parab : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून माजी मंत्री रामदास कदम यांनी खळबळजक आरोप केला होता. त्यांनी केलेल्या आरोपामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले होते ते का घेण्यात आले, असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला होता.
त्यांनी केलेल्या या आरोपावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. उद्धवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत मोठा खुलासा केला आहे. माझ्यावर तेव्हा जबाबदारी होती.
बाळासाहेब यांच्या अंतिमक्षणी मी होतो आणि त्याचा मी साक्षीदार आह, असं अनिल परब म्हणाले. तसेच रामदास कदम यांना 14 वर्षांनी कंठ का फुटला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. रामदास कदम यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी अनिल परब यांनी केली. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर आता कोर्टात खेचणार असल्याचा इशाराही परबांनी दिला आहे.
रामदास कदम यांची अक्कल गुडघ्यात
बाळासाहेबाच्या मृतदेहाबाबत विधान करताना रामदास कदम यांनी अत्यंत खळबळजनक आरोप करत बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेतले होते, असं म्हटलं होतं. आता या दाव्यावर आमदार अनिल परब यांनी स्पष्टीकरण देत हा आरोप धुडकावून लावला आहे. हे 100 टक्के खोटं आहे. बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती. कुठलीही बॉडी दोन दिवस शवपेढीशिवाय ठेवता येते का? असा सवाल त्यांनी रामदास कदम यांना केला आहे. तसेच रामदास कदम यांची अक्कल गुडघ्यात आहे, अशी बोचरी टीका अनिल परबांनी रामदास कदम यांच्यावर केली.
अनिल परब यांचा खुलासा
रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या हातांच्या ठस्याबाबत हे ठसे संपत्तीसाठी घेतले होते का? असा सवाल केला होता. यावर बाळासाहेबांचं मृत्यूपत्र माझ्याकडं आहे. त्यांची संपत्ती काय होती, मला माहिती आहे, असं सडेतोड उत्तर अनिल परब यांनी दिलं. रामदास कदम यांचे आरोप खोटे आहेत. बाळासाहेब यांनी स्वत:चे मोल्ड बनवले होते. अंधेरीच्या सहारा स्टेडियममध्ये त्यांनी मोल्ड ठेवले होते, असा खुलासा परबांनी केला. रामदास कदमचं शिक्षण कमी होते. बाळासाहेब गेल्यानंतर असे कोणते ठसे घेतले? त्याचा काय फायदा होतो? असा सवाल अनिल परब यांनी केला.





