पिंपरी | अतिक्रमणे हटवा अन्यथा आंदोलन करणार

देहूगाव, (वार्ताहर) – देहू ते तळवडे दरम्यान रस्त्यावरील दुतर्फा असणारे अतिक्रमण हटवावे आणि रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा देहूगाव ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले आहे.
देहू-आळंदी राज्य महामार्ग क्रमांक ११६ हा रस्ता मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक विभाग (दक्षिण) पुणे यांनी एक दशकापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडे हस्तांतरित केला आहे. या रस्त्याची देखभाल पालिका करीत आहे.
सध्या या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झालेली दिसत आहे. तसेच नैसर्गिक ओढ्यावर बांधकामे झाली असून पाण्याचा निचरा होत नसल्याने जवळपासच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत आहे.
सदर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी शासनाने निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रातील अतिक्रमणे काढावीत आणि रस्त्याचे काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासक नगरपंचायतीकडे केली आहे. याबाबत माऊली काळोखे यांनी उपुमख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे.




