Nagar | अतिक्रमणे काढण्यासाठी नागरिकांचा उपायुक्तांना घेराव

नगर, (प्रतिनिधी)- महापालिका हद्दीतील देवी मंदिर परिसर केडगाव येथील मुख्य रस्त्यावरील जुने भुसारे घर ते केडगाव देवी मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या मधोमध केलेले अतिक्रमण १५ दिवसांच्या आत काढण्यात यावे, अतिक्रमण धारकावर तात्काळ कारवाई करण्यात येऊन आमच्या हक्काचा मुख्य रस्ता खुला करण्यात यावा, अन्यथा परिसरातील सर्व नागरिक हे महानगरपालिकेमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा देत मनपा उपायुक्तांना घेराव घालण्यात आला.
शहराचे उपनगर असलेल्या केडगाव देवी मंदिर परिसर येथील सर्वे नं. १८४/१ व १८४/१ब येथे मुख्य रस्त्यावरील जुने भुसारे घर ते केडगाव देवीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या मधोमध अतिक्रमण करण्यात आलेले आहे. ज्यामुळे परिसरातील जवळपास ३०० ते ४०० नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हे अतिक्रमण करण्यात आलेले आहे. यापूर्वी देखील या भागातील नागरिकांनी याबाबत मनपा प्रशासनाला निवेदन दिलेली आहे.
तसेच उपोषण देखील केलेले होते. परंतु, अद्यापही यावर कुठल्याही प्रकारची कारवाई मनपा प्रशासनाने अतिक्रमण धारकावर कारवाई केलेली नाही. असे असतानाही अजूनही काहीजण याच ठिकाणी अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नात आहे.
तसे झाल्यास या भागातील नागरिकांना आणखीनच त्रास होणार आहे. सध्या पावसाळा असल्याने या ठिकाणी खूप चिखल साचलेला आहे.
काही नागरिक या चिखलातून पडून जखमी झालेले आहेत. त्यामुळे हे मुख्य रस्त्यावर केलेले अतिक्रमण लवकरात लवकर काढण्याच्या मागणीसाठी मनपा उपायुक्त यांना निवेदन देत घेराव घालण्यात आला.
यावेळी गणेश शेळके, मनोहर बगळे, सागर औसरमल, सतीश कुलकर्णी, अक्षय भोसले, अंबादास सोळसे, ज्ञानेश्वर खाडे, गोकुळ थोरात, सुनील हनवते, उत्तम मुरूमकर, कृष्णा नवसुपे, मयूर रोकडे, विकास केकाण,
सुनील रोकडे, कुचेकर, महेश चव्हाण, सुनील शिंगरे, दत्तात्रय उमाप, विजय वेदपाठक, पवन बनकर, ओम बनकर, रेखा साके, छाया शिंदे, उषा शिंदे, अनिता गायकवाड, सरस्वती वेदपाठक, सुंदर सोळसे, संगीता भनगाडे आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





