Nagar | शिर्डीतील बेकायदेशीर फ्लेक्स काढा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शिर्डी, (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात अनेक शहरात फ्लेक्स बोर्ड व होर्डिंगवर बंदी असताना शिर्डी शहरात मात्र सरकारच्या आदेशाची पायमल्ली होत आहे, असा आरोप शिर्डी शहराचे काँग्रेस अध्यक्ष अमृत गायके, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर व शिवसेनेचे विजय जगताप यांनी केला.
याविषयी वारंवार तक्रार करूनही शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे वरील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी यांना भेटून त्यांना निवेदन दिले. आता यावर काय कारवाई होते हे महत्वाचे असणार आहे.
मुंबई येथील होर्डिंग्जच्या दुर्घटनेनंतर राज्यात बेकायदेशीर फ्लेक्स, होर्डिंग्जवर बंदी घालण्यात आली असून, मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शासन विशेष काळजी घेत आहे.
मात्र, शिर्डी शहरात कुठलीही परवानगी न घेता अनेक चौकात तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाढदिवसाचे, पक्षीय निवडीचे, शुभेच्छाचे असे अनेक मोठेमोठे फ्लेक्स लागले असून यामुळे शिर्डीचे विद्रुपीकरण होत आहे, असा आरोप अमृत गायके यांनी केला. यावर प्रशासनाने त्वरित कायदेशीर कारवाई करावी.
वास्तविक सुरुवातीला मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी फ्लेक्सबाबत कडक निर्णय घेतला होता मात्र राजकीय दबावापोटी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने शिर्डी शहरात फ्लेक्स लावण्याची जणूकाही स्पर्धा सुरू आहे का? असाच प्रश्न हे फ्लेक्स पाहिल्यानंतर ग्रामस्थ्यांना पडला आहे.
अर्थात हा चुकीचा पायंडा कुठेतरी थांबावा, यासाठी शिर्डीतील सर्वपक्षीय नेते एकवटले असून अमृत गायके, रमेश गोंदकर व विजय जगताप यांनी नगर येथे जाऊन थेट जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिली.





