Shirdi news : विठ्ठल पवारांच्या नेतृत्वात एम्प्लॉईज सोसायटीचा प्रगतीचा आलेख उंचावला – डॉ. सुजय विखे पाटील

प्रभात वृत्तसेवा
शिर्डी – एम्प्लॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामकाज करून संस्थेचा प्रगतीचा आलेख उंचविला असून, त्यांच्या माध्यमातून मला चांगला मित्र भेटला, अशी शाबासकीची थाप डॉ.सुजय विखे पाटील यांनी चेअरमन विठ्ठलराव पवार यांच्यावर टाकत त्यांच्या कामाचे कौतुक केले.श्री साईसंस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे आयोजित दीपावली भेटवस्तू वितरण उपक्रमाचा शुभारंभ डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर, डेप्युटी सीईओ भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप भोसले, कमलाकर कोते, निलेश कोते, नितीन कोते, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव पवार, उपाध्यक्ष पोपटराव कोते, संचालक भाऊसाहेब कोकाटे ,संभाजी तुरकणे, मिलिंद दुनबळे, भाऊसाहेब लबडे, रंभाजी गागरे, संभाजी कोते, तुळशिराम पवार,भाऊसाहेब लवांडे , विनोद कोते, देविदास जगताप, रवींद्र गायकवाड, कृष्णा आरणे, बाबासाहेब अनर्थ, इकबाल तांबोळी, महादू कांदळकर,सुनंदा जगताप, लता बारसे, सचिव विलास वाणी व आदी मान्यवर उपस्थित होते.
या समारंभात डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीवर भाष्य करताना त्यांनी, “विरोधकांनी पंचवीस वर्षांत प्रयत्न केले तरी आमदारपद आजही विखे साहेबांकडेच आहे. हा साईबाबांचा निर्णय होता आणि बाबांचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय,” असे ठणकावून सांगितले. नगराध्यक्षपदाचे आरक्षण कोणतेही पडो, शिर्डीचा विकास राधाकृष्ण विखे पाटीलच करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रलंबित ५९८ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना डॉ. विखे यांनी सहानुभूती दर्शवत, “शत्रू बाहेर नसतो, घरातच असतो,” अशा शब्दांत याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. मात्र, या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी दिला. साई संस्थानच्या रुग्णालयांना शिस्त लावण्यासाठी आठवड्यातून एक दिवस विना मोबदला सेवा देण्याची तयारी दर्शवत, तसा अर्ज संस्थानला करणार असल्याचे जाहीर केले. प्रास्ताविक चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी केले.





