प्रभात वृत्तसेवा शिर्डी – “दारूवाले, मटक्यावाले आणि वाळूवाल्यांचा लिडर महाराष्ट्राला वेठीस धरतोय. मराठा समाजाचे अनेक नेते आहेत, एकट्या जरांगेची मक्तेदारी नाही,” अशा कठोर शब्दांत अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका केली.शिर्डी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले, “जरांगे यांच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्याला काही शिक्षण आहे का? काही ज्ञान आहे का? दारूवाले, मटक्यावाले आणि वाळूवाल्यांना घेऊन तो महाराष्ट्राला वेठीस धरतोय. हा मराठा समाजाचा नेता नाही. मराठा समाजाचे अनेक नेते आहेत. शरद पवार, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यासारखे अनुभवी नेते आजही समजदारीने राज्यकारभार सांभाळत आहेत.भुजबळ म्हणाले, “मी ५७ वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मला नेता बनवलं. दोनदा मुंबईचा महापौर झालो. मंडल आयोगामुळे काँग्रेसमध्ये गेलो. १९९१ साली कॅबिनेट मंत्री झालो, तेव्हा आजचे अनेक मंत्री राजकारणात नव्हतेही. मी आजही समाजासाठी काम करतोय. कुणाचंही बंधन माझ्यावर नाही.” मनोज जरांगे यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना भुजबळ म्हणाले, “जरांगे हा मुद्दामहून समाजात वितुष्ट पेरतोय. त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या दारूवाल्या-मटक्यावाल्यांनी बीडमध्ये आमदारांची घरं जाळली, त्यांच्या लेकरांना मारण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना बरोबर घेऊन तो राज्यात दंगली घडवतोय. हे पाप आहे. आत्तापर्यंत मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले, पण कधीच समाजात फूट पडली नव्हती.”भुजबळ यांनी पुढे सांगितले, “मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील ‘इंडेक्स बेस्ड आरक्षण’ दिल्यानंतर सर्व प्रश्न मिटले होते. पण जरांगे आणि त्याच्या साथीदारांनी मुद्दामहून वातावरण बिघडवलं आहे. तो लोकांना चुकीच्या दिशेने नेत आहे. दंगली, वितुष्ट आणि दुश्मनी निर्माण करण्यासाठीच त्याची चळवळ आहे.”अजित पवार नाराजीबाबत विचारले असता, भुजबळ म्हणाले, “अजित पवार मला काही बोलले नाहीत. त्यांना काही बोलायचं असतं तर ते थेट बोलले असते. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी शिवसेना सोडली ती समाजकारणासाठीच. कुठंही गेलो तरी समाजाची भुमिका मांडत राहणार आहे.