Shirdi News : जगप्रसिद्ध श्री साईबाबा मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत, दर अर्ध्या तासाने वेषांतर करून चोरी करणाऱ्या आंध्र प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा शिर्डी पोलिसांनी यशस्वी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन महिला, एक पुरुष आणि एक अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, एक पुरुष आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून महागड्या कंपनीचे १० मोबाइल फोन, १,१७० रुपये रोख रक्कम, ब्लेड्स आणि कटर जप्त केले आहेत. कशी उघडकीस आली टोळी? एक भाविकाच्या पर्स ब्लेडने कापून चोरी झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये संशयित व्यक्ती वारंवार कपडे बदलताना दिसल्या. सुरुवातीला पंजाबी ड्रेस, नंतर साडी नेसून गर्दीत मिसळताना. महिलांनी हे वेषांतर करून पोलीस आणि मंदिर सुरक्षारक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. ही टोळी भाविकांसारखाच वेश परिधान करून मंदिर परिसरात फिरत होती. पर्स ब्लेडने कापून चोरी करण्याची ही त्यांची मुख्य पद्धत होती. आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील आत्माकुर गावातील ही टोळी असल्याचे तपासात समोर आले आहे. अल्पवयीन बालकाला चिल्ड्रन होममध्ये दाखल करण्यात आले असून, फरार पुरुषाच्या शोधासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. साईबाबा मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अशा टोळ्यांमुळे सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केल्याने भाविकांना दिलासा मिळाला आहे, पण पुढील तपास आणि फरार आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.