Vadgaon Nagar Panchayat: अतिक्रमणे २४ तासांत हटवा, अन्यथा निष्कासन कारवाई; वडगाव नगरपंचायतीचा इशारा
कारवाईचा खर्चही करणार वसूल

वडगाव मावळ – शहरातील सार्वजनिक रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमणे २४ तासांत स्वखर्चाने हटवावीत, अन्यथा नगरपंचायत प्रशासनाकडून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येईल, असा इशारा वडगाव नगरपंचायत प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमणांवर लवकरच हातोडा पडण्याची शक्यता आहे.
वडगाव नगरपंचायत हद्दीतील मुख्य बाजारपेठ परिसर तसेच वडगाव-तळेगाव साखळी रस्त्यालगत सार्वजनिक रस्त्यांवर काही व्यक्ती, पथविक्रेते आणि व्यावसायिकांनी अनधिकृतपणे अतिक्रमणे केली आहेत. यामध्ये टपऱ्या, शेड, हातगाड्या, व्यावसायिक साहित्य, दुकानांसमोरील पत्र्याचे शेड, नामफलक तसेच वाहनांचे पार्किंग रोखण्यासाठी ठेवलेल्या लोखंडी जाळ्या आदींचा समावेश आहे.
या अतिक्रमणांमुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
पादचारी आणि वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, रस्त्यांचा वापरही बाधित होत आहे. परिणामी वाहतूककोंडी आणि अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. याबाबत नगरपंचायतीने संबंधित पथविक्रेते, व्यावसायिक आणि अतिक्रमणधारकांना वारंवार सूचना व नोटिसा दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही व्यावसायिकांकडून अतिक्रमणे हटविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी २४ तासांत अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन केले आहे.
मुख्य बाजारपेठ परिसर आणि वडगाव-तळेगाव साखळी रस्त्याच्या हद्दीतील सर्व अनधिकृत अतिक्रमणे जाहीर आवाहन प्रसिद्ध झाल्यापासून २४ तासांच्या आत स्वखर्चाने हटवून सार्वजनिक रस्ते मोकळे करावेत, असे नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे.
निर्धारित वेळेत अतिक्रमणे न हटविल्यास नियमानुसार निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी येणारा खर्चही संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नगरपंचायत अॅक्शन मोडवर
मावळ तालुक्यातील लोणावळा शहरात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असतानाच आता वडगाव नगरपंचायत प्रशासनही अॅक्शन मोडवर आले आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील अतिक्रमणे दोन महिन्यांत हटविण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर वडगाव नगरपंचायतीनेही अतिक्रमाणांविरोधात कारवाईचा इशारा दिल्याने अतिक्रमणधारक धास्तावले आहेत.
‘शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर विविध प्रकारची बांधकामे आणि पत्र्यांची शेड उभारून अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी ती तातडीने काढून घ्यावीत. २४ तासांत अतिक्रमणे न हटविल्यास नगरपंचायत प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.’ – डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी, वडगाव नगरपंचायत
Jensen Huang: ट्रम्प यांचे आभार, कर्मचाऱ्यांची जाहीर माफी! जेन्सेन हुआंग यांनी बैठकीत काय सांगितले?





