Vadgaon Nagar Panchayat – वडगाव नगरपंचायतीच्या चार विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची निवड शुक्रवारी (दि. २३) बिनविरोध पार पडली. स्थायी समितीसह चारही विषय समित्यांच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची निवड झाली असून, भाजपकडून कोणत्याही पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे नियोजन व विकास समितीची निवड प्रक्रिया न झाल्याने ती समिती सध्या रिक्त राहिली आहे.पीठासन अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगराध्यक्षा अबोली ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजय म्हाळसकर, पक्ष प्रतोद माया चव्हाण, भाजपचे गटनेते दिनेश ढोरे, पक्ष प्रतोद अनंता कुडे, पूनम भोसले, रोहित धडवले, विशाल वहिले, सारिका चव्हाण, राणी म्हाळसकर, स्वीकृत सदस्य पंढरीनाथ ढोरे, संदीप म्हाळसकर, कार्यालयीन अधीक्षक मनिषा चव्हाण आदी उपस्थित होते. परंतु विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर अनुपस्थित होत्या. राष्ट्रवादीकडे बहुमत, समित्यांची निवड निश्चित नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ नगरसेवक आणि एक अपक्ष असा १० सदस्यांचा गट असून, भाजपचे सहा नगरसेवक व एक अपक्ष असा सात सदस्यांचा गट आहे. पक्षीय बलाबलानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला चार विषय समित्यांची सभापतिपदे आणि प्रत्येक समितीतील पाच पैकी तीन सदस्यपदे मिळणे निश्चित झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस त्यानुसार सभापती आणि सदस्यपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने सर्व निवडी बिनविरोध पार पडल्या. नगराध्यक्षा अबोली ढोरे या स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती असतील, तर उपनगराध्यक्ष सुनील ढोरे हे पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे पदसिद्ध सभापती असतील, असे सभेत सर्वानुमते ठरले. भाजपचा अलिप्त राहण्याचा निर्णय भाजपच्या एकाही नगरसेवकाने कोणत्याही समितीच्या सभापती अथवा सदस्यपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल न केल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. याबाबत भाजपचे गटनेते दिनेश ढोरे यांनी सांगितले की, वडगावच्या विकासासाठी भाजपने उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला बिनविरोध दिले होते. त्याबदल्यात पाच पैकी किमान दोन विषय समित्यांची सभापतिपदे भाजपला देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही विषय समित्यांपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नगरसेवक म्हणून आम्ही जनतेच्या सेवेत कार्यरत राहणारच आहोत. विषय समित्यांचे सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे – स्थायी – अबोली ढोरे (सभापती, पदसिद्ध), सदस्य – सुनील ढोरे, गणेश म्हाळसकर, सुनीता ढोरे, माया चव्हाण पाणीपुरवठा व जलनिस्सारण – सुनील ढोरे (सभापती), सदस्य – वैशाली सोनवणे, आकांक्षा वाघवले सार्वजनिक बांधकाम – गणेश म्हाळसकर (सभापती), सदस्य – अजय भवार, आकांक्षा वाघवले महिला व बालकल्याण – सुनीता ढोरे (सभापती), पूनम भोसले (उपसभापती), सदस्य – वैशाली सोनवणे स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य – माया चव्हाण (सभापती), सदस्य – अजय म्हाळसकर, रूपाली ढोरे