लाहोर :– पाकिस्तानात अहमदी समुदायाच्या दफनभूमीतील काही थडग्यांची काही धार्मिक कट्टरवाद्यांनी विटंबना केल्याचे उघड झाले आहे. (Religious extremists desecrate Ahmadi graves in Pakistan) पाकिस्तानातील पंजाब प्रांतात हा प्रकार घडला. अहमदी समुदायाच्या बाबतीत गेल्या तीन महिन्यांपासून दुसऱ्यांदा असा प्रकार घडला आहे.
लाहोर शहरापासून 100 किलोमीटर अंतरावरील हाफिजाबादेतील प्रेम खोत दफनभूमीत काही थडग्यांवरील दगड फोडून टाकण्यात आले होते. या थडग्यांवर अहमदी समुदायाबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहील्याचे आढळून आले आहे. अहमदींच्या भावना दुखावण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याचे जमात अहमदिया पाकिस्तानचे पदाधिकारी आमिर मोहम्मद यांनी वृत्तसंस्तेला सांगितले. अहमदी समुदायातील व्यक्तीला मृत्यूनंतरही शांतता लाभू शकत नाही, थडग्यांमध्येही अहमदी व्यक्ती सुरक्षित राहू शकत नाही, असे ते म्हणाले.
यापूर्वीही पंजाब प्रांतात अहमदी समुदायाच्या दफनभूमीमध्ये थडग्यांची विटंबना करण्याचे प्रकार घडले होते. मात्र त्या संदर्भात एकाही दोषीला शिक्षा झाली नव्हती. ऑगस्ट महिन्यात अहमदींच्या दफनभूमीतील 16 थडग्यांची विटंबना करण्यात आली होती.
पाकिस्तानात अहमदींना नेहमीच इस्लामी कट्टरवाद्यांकडून लक्ष्य केले जात असते. पाकिस्तानचे माजी लष्करी हुकुमशहा जनरल झिया उल हक यांनी अहमदींनी स्वतःला मुस्लिम संबोधणे हे शिक्षापात्र गुन्हा असल्याचे म्हटले होते.