सातारकरांना दिलासा ! दमदार पावसाने महादरे तलाव भरला

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला महादरे तलाव भरून वाहू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आधी हत्ती तलाव भरला. त्यानंतर महादरे तलाव वाहू लागला आहे. त्यामुळे पश्चिम भागातील पाणी कपातीचे संकट टळले आहे. संपूर्ण शहरातील पाणीकपात मागे घेण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.
सातारकरांना एप्रिल आणि मे महिन्यांत पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. शहराच्या व्यंकटपुरा पेठ, रामाचा गोट, चिमणपुरा पेठ या भागाला पाणीपुरवठा करणारा महादरे तलाव आटला होता.
त्यामुळे या भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी कास तलावातून अतिरिक्त पाणी उचलले जात होते; परंतु गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात पावसाचा जोर आहे. गेल्या 48 तासापासून सातारा शहर आणि जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणार्या मुख्य स्रोतांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.
महादरे तलाव 45 फूट खोल आहे. हा तलाव सोमवारी दुपारी काठोकाठ भरून, पाणी भिंतीवरून वाहू लागले. कास तलावसुद्धा भरण्याच्या मार्गावर असून, सध्या 55 फूट पाणीसाठा झाला आहे. हा तलाव पूर्ण भरायला केवळ पाच फूट राहिले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास, येत्या दोन दिवसांत तलाव भरेल, अशी माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली.





