सातारा – गेल्या 70 वर्षापासून कोयना धरणग्रस्त लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे . पंधराशे ते अठराशे खातेदार हे पुनर्वसन अंतर्गत देय जमिनीपासून पूर्णतः वंचित आहेत पाटण जावली महाबळेश्वर तालुक्यातील कोयना धरण जलाशयाच्या आजूबाजूच्या डोंगरजमिनी उताराच्या असल्याने त्या जमिनीचा लोकांना कोणताही उपयोग झालेला नाही. यासंदर्भात तातडीने तोडगा काढण्यासाठी जिल्हास्तरीय व विभाग पातळीवर तातडीने बैठका घेतल्या जाव्यात असे लेखी निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत. याबाबतची माहिती कोयना धरणग्रस्त संग्राम संघटनेचे कार्यकर्ते चैतन्य दळवी, सचिन कदम, सिताराम पवार, महेश शेलार, रामचंद्र कदम, परशुराम शिर्के ,यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. या पत्रकात नमूद आहे की कोयना धरणग्रस्त वेळोवेळी आंदोलने मोर्चे उपोषण करून शासनाचे लक्ष वेधून घेत आहेत सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1200 च्या आसपास कोयना धरणग्रस्त पर्यायी जमिनीची मागणी करत आहेत. जमीन पसंतीसाठी अर्ज सुद्धा करण्यात आलेले आहेत. मात्र, त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही. प्रकल्पग्रस्तांचा अहवाल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्त यांच्याकडे आणि विभागीय आयुक्तांकडून मंत्रालयस्तरावर घेणे गरजेचे होते तसे आजतागायत झालेले नाही. यासंदर्भात कोयना धरणग्रस्त संग्राम संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते चैतन्य दळवी यांनी यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेतली. या बैठकीनंतर पाटील यांनी विभागीय आयुक्तांना यासंदर्भात तातडीने बैठक घेतली जावी असे निर्देश दिलेले आहेत. धरणग्रस्तांचे गावठाणाच्या संदर्भातील आणि जमीन अधिग्रहण संदर्भातील जे प्रश्न आहे ते तातडीने सोडवले जावेत असे त्यांनी निर्देशित केले आहे. कोयना धरणग्रस्त संग्राम संघटनेच्या माध्यमातून धरणग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात कोयनानगर येथे मेळावा घेण्यात आला होता . या मेळाव्यात पुनर्वसन मंत्री यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधून मंत्री महोदयांना भेटण्यासाठी वेळ मागण्यात आली होती. या मागणीची अनिल पाटील यांनी तातडीने दाखल घेतली आहे. धरणग्रस्तांना जमीन मिळण्यासाठीचा एक मार्ग बैठकांच्या माध्यमातून चालू होईल असा विश्वास धरणग्रस्तांनी व्यक्त केला आहे. मदत व पुनर्वसन कार्यालयाच्या सहकार्याबद्दल पाटील यांचे खाजगी सचिव डॉ. नितीन महाजन, संजीव देशमुख, किशोर पाटील, दशरथ लवटे यांचे कोयना धरणग्रस्तांनी आभार मानले आहेत