नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स समूहासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित जाहीरनामा जाहीर केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ही कंपनी आपल्या सहा लाख कामगारांची उत्पादकता दहा पटीने वाढविणार आहे. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर तितकाच सकारात्मक परिणाम होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हे मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतात डिजिटल बदलाचे जसे नेतृत्व केले तसेच नेतृत्व ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात करणार आहे. कंपनी स्वतःच्या कर्मचार्यांसाठी आणि विभागासाठी ज्या दर्जाचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपलब्ध करणार आहे त्याच दर्जाचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, तेही माफक किमतीत, भारतीय नागरिकांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. या स्थित्यंतराला मार्गदर्शक तत्व सुचविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या प्रत्येक कर्मचार्यांचा कौशल्य विकास कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून करणार आहे. नवे जग याच पद्धतीने काम करणार आहे, हे मुख्य सूत्र या बदलात असणार आहे. यामुळे कामाची वारंवारता टाळता येईल. त्याचबरोबर निर्णय क्षमता अधीक परिणामकारक होईल. कामाचा दर्जा आणि वेग वाढेल. त्याचबरोबर हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त उत्तरदायी राहील यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. अंबानी म्हणाले की, जाहीरनामाच्या दुसर्या टप्प्यात समस्त भारतीय नागरिकांना हे तंत्रज्ञान कमी किमतीत दर्जेदार स्वरूपात उपलब्ध होईल याचा प्रयत्न करणे हे आहे. त्यामुळे कामाचा दर्जा, वेग 10 पटीने वाढेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबरच भारतीय मनुष्यबळ याच वेगाने आपली उत्पादकता वाढवू शकेल असे अपेक्षित आहे.