रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य पुन्हा 20 लाख कोटीवर

मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीज या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीच्या शेअरचा भाव आज तब्बल चार टक्क्यांपर्यंत वाढला. त्यामुळे मुख्य निर्देशांकांना आधार मिळण्याबरोबरच या कंपनीचे बाजार मूल्य वाढले. आज एका दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 70 हजार कोटी रुपयांनी वाढून 20.21 लाख कोटी रुपयावर पातळीवर गेले आहे. (Reliance Industries’ market cap again at Rs 20 lakh crore; The share price at Rs 2,987)
आता या कंपनीच्या शेअरचा भाव 2,987 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला आहे. यासंदर्भात बोलताना काही विश्लेषकांनी सांगितले की, जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती बर्याच कमी झाल्या आहेत. याचा फायदा रिलायन्स इंडस्ट्रीजसह देशातील इतर तेल कंपन्यांना होण्याची शक्यता आहे. विशेषत: तेल शुद्धीकरणातील रिलायन्स इंडस्ट्रीचा नफा वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या भावात आज बरीच वाढ झाली असल्याचे दिसून आले. 13 फेब्रुवारी रोजी रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरचा भाव वाढल्यामुळे या कंपनीचे बाजार मूल्य 20 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. मात्र त्यानंतर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक बर्याच प्रमाणात कमी झाल्यानंतर या कंपनीचे बाजार मूल्य 20 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी झाले होते.
नंतर पुन्हा या कंपनीचे बाजार मूल्य 20 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. बाजार मूल्यात रिलायन्स सर्वात मोठी कंपनी आहे. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल या कंपन्यांचा नंबर लागतो. यावर्षी आतापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरचा भाव 15.59 टक्क्यांनी वाढला आहे.





