रिलायन्स इंडस्ट्रीजचा चमकदार ताळेबंद; शेअरच्या भावात 4% वाढ, बाजार मूल्य $19.84 लाख कोटींवर

नवी दिल्ली – देशांतर्गत आणि जागतिक परिस्थिती खराब असल्याचे बोलले जात असतानाच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने शुक्रवारी चमकदार ताळेबंद जाहीर केला. त्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या भावात सोमवारी चार टक्के वाढ होऊन कंपनीच्या शेअरचा भाव 1,467 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला.
परिणामी या कंपनीचे बाजार मूल्य एकाच दिवसात 67,459 कोटी रुपयांनी वाढवून 19.84 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. कंपनीने शुक्रवारी जाहीर केलेल्या ताळेबंदानुसार कंपनीच्या रिटेल आणि दूरसंचार विभागाने उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे या समूहाचा नफा दुसर्या तिमाहीत 9.6 टक्क्यांनी वाढला आहे.
या तिमाहीत कंपनीला 18165 कोटी रुपयांचा नफा मिळविण्यात यश मिळाले. गेल्या वर्षी दुसर्या तिमाहीत या कंपनीला 16,563 कोटी रुपयांचा नफा झाला होता. वार्षिक पातळीवर नफा वाढला असला तरी तिमाही पातळीवर कंपनीचा नफा 33 टक्क्यांनी कमी झाला आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीला 26,994 कोटी रुपयाचा नफा झाला होता.
दूरसंचार क्षेत्रातील ब्रॉडबँड सेवेमुळे कंपनीच्या नफ्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. प्रति ग्राहक महसूल वाढला आहे. यामुळे दूरसंचार विभागाचा नफा 22 टक्क्याने वाढण्यास मदत झाली आहे. अशा परिस्थितीत समूहाचा एकूणच नफा वाढण्यास मदत झाली.
दूरसंचार विभागाला 7,379 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. विशेष म्हणजे भारतातील मोबाईलचे दर जगात सर्वात कमी आहेत.
मात्र तरीही कंपनीने कार्यक्षमता वाढवून या विभागाचा नफा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफादायक ताळेबंदर जाहीर झाला आहे. त्यामुळे दुसर्या तिमाहित इतर कंपन्यांच्या नफ्यातही वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत रिलायन्स कंपनीच नाही तर एकूणच शेअर बाजाराचे निर्देशांक वाढण्यासही मदत होत आहे.





