अहमदनगर – जवळा, दिघी व चोंडी बंधाऱ्याला पाणी सोडा

जवळा – सध्या सुटणाऱ्या कुकडीच्या आवर्तनातून जवळा, दिघी व चोंडी बंधाऱ्याला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे कोळवंडी येथील कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या वेळी युवा नेते अशोक पठाडे, सरपंच सुसेन ढवळे, प्रशांत पाटील, अनिल पवार, सुरेश रोडे, राजेंद्र महाजन उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, सध्या जामखेड तालुक्यात कमी पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, रब्बी पिके जगवणे व पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर कुकडीच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या जामखेड तालुक्यातील चोंडी व जवळा आणि कर्जत तालुक्यातील दिघी हे सीना नदीवरील तीन बंधारे कोरडेठाक पडलेले आहेत. या बंधाऱ्यांमध्ये कुकडीच्या सुरू होणाऱ्या आवर्तनातून पाणी सोडावे, अशी मागणी कार्यकारी अभियंता धायगुडे यांच्याकडे निवेदनात करण्यात आली.





