कुकुडीचे पाणी विसापूर तलावात सोडा महाविकास आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

नारायणडोहो – नगर तालुक्यातील घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी विसापूर तलावात पाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. विसापूर तलावात कुकडीचे पाणी सोडल्यास घोसपुरी पाणी पुरवठा योजना सुरळीत चालू होणार आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ कुकुडीचे पाणी विसापूर तलावात सोडावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सध्या घोसपुरी प्रादेशिक पाणी योजने अंर्तगत गावांना गढूळ पाणी पुरवठा होत आहे. बाबुर्डी घुमट, खंडाळा, वाळकी, हिवरे झवरे, सारोळा कासार इतर गावासह पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी गढूळ येत असल्याने पाणी मानवी आरोग्य पिण्यास योग्य नाही.
या पाण्यामुळे साथीचे, पोटाचे आजार फैलावण्याची शक्यता आहे. यातून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. पावसाचे प्रमाण सुध्दा अत्य प्रमाणात कमी आहे. वरील विषयाचा विचार प्रशासनाने तत्काळ विचार करून कुकुडीचे पाणी विसापूर तलावात सोडावे, प्रशासनाने टंचाई गावाचा आढावा घेऊन टँकरद्वारे त्वरीत पाणीपुरवठा करावा, अन्यथा पुढील आठवड्यात नगर-दौंड रस्त्यावर टंचाई गावातील माता-भगिनी ग्रामस्थांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, माजी सभापती रामदास भोर, मा.पं सदस्य पोपट निमसे , रामदास भालसिंग, जनार्दन मदने यांनी दिला आहे.




