Indapur : नीरा नदीला भाटघरमधून तीन टीएमसी पाणी सोडा; हर्षवर्धन पाटील यांची मागणी
Indapur : या पत्रातील मागण्यांवर समितीच्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित असून, या बैठकीला हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत.

इंदापूर : नीरा नदीचे कोरडे पडलेले पात्र, बंद पडलेल्या नळ पाणीपुरवठा योजना आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता भाटघर धरणातून नीरा नदीत सुमारे ३ टीएमसी पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर नीरा डावा कालवा व खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्याच्या टोकाकडील गावांना प्राधान्य देत ‘टेल टू हेड’ पद्धतीने आवर्तन सोडावे आणि शेटफळ हवेली तलावातून तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या मागण्यांबाबत चालू महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, पाणी नियोजनाकडे इंदापूर तालुक्यासह नीरा नदीकाठच्या गावांचे लक्ष लागले आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे आणि कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांना पत्र पाठविले आहे. या पत्रातील मागण्यांवर समितीच्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित असून, या बैठकीला हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत.
सध्या निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. नीरा नदीचे पात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या गावांतील नळ पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. तसेच नदीकाठच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर भाटघर धरणातून नीरा नदीपात्रात सुमारे तीन टीएमसी पाणी सोडून नदीवरील बंधाऱ्यांचे तीन ढापे अडविण्यात यावेत, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. त्यामुळे फलटण, बारामती, इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा मिळण्यासह जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
टेल टू हेड आवर्तनाची मागणी
नीरा डावा कालवा आणि खडकवासला कालव्यातून तातडीने आवर्तन सोडताना इंदापूर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ‘टेल टू हेड’ पद्धतीने पाणी सोडल्यास लाभक्षेत्रातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच चारा पिकांच्या निर्मितीसाठी मदत होऊ शकते. त्यामुळे आवर्तनाच्या नियोजनात शेवटच्या टोकावरील गावांचा विचार होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शेटफळ तलावाच्या आवर्तनाकडे लक्ष
शेटफळ हवेली (ता. इंदापूर) तलावात सध्या पाणीसाठा उपलब्ध झाला असतानाही या तलावाच्या लाभक्षेत्रातील दहा गावांना गेल्या पाच महिन्यांपासून आवर्तन मिळालेले नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे तलावातून तातडीने आवर्तन सुरू करून नागरिकांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच चारा निर्मितीसाठी मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.





