‘अमेरिकेबरोबरचे संबंध दुरुस्त केले जातील, मात्र चीनबाबतच्या भूमिकेत बदल नाही’ – शहबाज शरीफ

लाहोर – अमेरिकेबरोबरचे संबंध पाकिस्तानला दुरुस्त करायचे आहेत. मात्र चीनबरोबरच्या संबंधांच्या बदल्यात ही दुरुस्ती केली जाणार नाही. कारण आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानसाठी चीनकडून जे काही केले जाते आहे ते अन्य कोणत्याही देशाला करणे शक्य नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.
चीनच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. चीन-पाकिस्तान-आर्थिक कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. अलिकडेच चीनच्या तज्ज्ञांनी पाकिस्तानला दिलेल्या भेटीदरम्यान विविध क्षेत्रात सहकार्याबाबत सकारात्मक हालचाली झाल्याचेही शरीफ यांनी सांगितले.
पाकिस्तानला अमेरिकेबरोबरचे संबंध दुरुस्त करावे लागतील. मात्र त्यासाठी चीनबरोबरच्या संबंधांची किंमत मोजली जाणार नाही. पाकिस्तानसाठी चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांबरोबरची मैत्री महत्वाची आहे, असे शरीफ म्हणाले.
आपले सरकार पाडण्यामागच्या कटात अमेरिकेचा हात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला होता. तेंव्हापासून पाकिस्तान आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध बिघडले आहेत.





