Wedding season: सुरू झाला रेशीमगाठी जुळण्याचा काळ; मंगल कार्यालयांचे बुकिंग फुल्ल!
पाणीटंचाईच्या शक्यतेमुळे मार्चपूर्वी विवाह उरकण्याकडे कल; २०२७ मधील शुभ मुहूर्त जाहीर

पिंपरी – तुळशी विवाहासोबत पिंपरी-चिंचवड शहरात लग्नसराईला सुरुवात झाली आहे. येत्या उद्या रविवारपासून (दि. २२) विवाह सोहळ्यांची धामधूम वाढणार आहे. सनई-चौघड्यांचे सूर आणि मंगलाष्टकांचा आवाज शहरात घुमू लागेल. मंगल कार्यालये, लॉन्स, केटरिंग व्यावसायिकांकडे लगबग सुरू झाली आहे.
दरम्यान, आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक कुटुंबांनी हिवाळ्यातच विवाह सोहळे उरकण्याचे नियोजन केले आहे. चातुर्मास संपल्यानंतर विवाह सोहळ्यांसाठी शुभ मुहूर्त सुरू होतात.
यंदा भागवत एकादशीपासून (दि. २१) त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाहाचा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर लग्नसराईला वेग येईल. या हंगामातील पहिला विवाह मुहूर्त २२ नोव्हेंबर २०२६ रोजी आहे. त्यामुळे वधू-वरांच्या कुटुंबीयांनी विवाहाच्या तयारीला सुरुवात केली आहे.
डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत विवाह सोहळे आयोजित करण्याकडे अनेकांचा कल आहे. पाहुण्यांची उपलब्धता, हवामान आणि कुटुंबीयांची सोय यांचा विचार करून तारखा निश्चित केल्या जात आहेत. उन्हाळ्यातील वाढते तापमान आणि पाण्याची संभाव्य कमतरता यामुळे मार्चपूर्वीच विवाह सोहळे पार पाडण्याचे नियोजन केले जात आहे.
परिणामी, शहरातील अनेक मंगल कार्यालये आणि लॉन्सचे आगाऊ बुकिंग झाले आहे. विवाह मुहूर्त निश्चित करताना पंचांगातील तिथी, नक्षत्र आणि ग्रहस्थितीला महत्त्व दिले जाते. वधू-वरांचे चंद्रबळ आणि गुरुबळ यांचाही विचार केला जातो.
मेष, कर्क, तूळ, धनू आणि कुंभ राशींना उत्तम गुरुबळ असल्याचे सांगितले जाते. मिथुन, सिंह, वृश्चिक आणि मीन राशींना मध्यम गुरुबळ आहे. त्यामुळे विवाह निश्चित करताना पुरोहितांचा सल्ला घेतला जात आहे.
विवाह सोहळ्यांच्या तयारीमुळे मंगल कार्यालये, सजावट व्यावसायिक, छायाचित्रकार, बँड पथके आणि केटरिंग व्यावसायिकांच्या व्यवसायाला चालना मिळणार आहे. पुढील काही महिन्यांत शहरात लग्नसराईची मोठी रेलचेल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
- पंचांगानुसार २०२७ मधील विवाह मुहूर्त
- जानेवारी : २६, २७, २९
- फेब्रुवारी : २, ३, १०, ११, १२, १५, २०, २४, २५, २७, २८
- मार्च : २, ४, १०, ११, १४, २३, २४, २५, २७, २९, ३१
- एप्रिल : १, ३, १६, १८, २४, २६, २८, २९, ३०
- मे : ९, १३, १४, १५, १७, १९, २०, २१, २५, २६, ३०, ३१
- जून : १, २, ११, १२, १५, १७, १९, २३, २४





