मुळा खाण्याचे काही खास फायदे

महाराष्ट्रात भाजी-भाकरीसोबत कांदा-मुळा आवडीने खाल्ला जातो. अनेकजण मुळ्याची भाजी किंवा मुळ्याची कोशिंबीर ताटात आली की नाक मुरडतात. मात्र, मुळा आणि मुळ्याची पाने गुणकारी असून त्याचा भरपूर फायदा आहे.
सॅलड किंवा भाजी दोन्ही रूपात मुळा गुणकारी आहे. मुळ्यात प्रोटिन, कॅल्शियम, गंधक, आयोडिन आणि लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. यात सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन आणि मॅग्नेशियमही असते. मुळ्यात अ जीवनसत्त्व, ब जीवनसत्त्व आणि क जीवनसत्त्वही पुरेशा प्रमाणात असतात. यामुळे वात, पित्त आणि कफ विकार दूर व्हायला मदत होते. याउलट जाडजूड मुळा खाणे त्रिदोषकारक आहे. मधुमेह, बवासीर आदी आजारांवर मुळा गुणकारी आहे. मुलींना मासिक पाळीत त्रास होत असेल, तर रोज एक मुळा पानांसह खा. मुळ्याचा रस काढून त्यात लिंबाचा रस मिसळून चेह-याला लावल्यास चेहरा उजळतो. मुळ्याची पाने आणि बिया एकत्र वाटून त्वचारोग झालेल्या ठिकाणी लेप दिल्यास त्वचारोग दूर होतो. मुळ्यात पोषक घटक मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे अनेक आजार दूर होतात.
- मूळव्याधीवर मुळा हा रामबाण उपाय मानला जातो. मुळा खाल्ल्याने मूळव्याध असलेल्या रुग्णाला आराम मिळतो. थंडावा मिळतो आणि पचनक्रिया सुधारते.
- मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो.
- जेवणात कच्चा मुळा किंवा मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने भूक चांगली लागते आणि अन्नाचं पचनही व्यवस्थित होतं.
- कच्चा मुळा पहाटे अनुशापोटी खाल्ल्याने कावीळ पूर्णत: बरी होते.
- रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखत असल्यामुळे मधुमेहींच्या रुग्णांनाही यामुळे लाभ होतो. किडनीच्या विविध विकारांवर औषधी ठरतं.
- पाणीदार असल्याने सेवनाने भूक शमते. म्हणूनच वजन कमी करू इच्छिणा-यांनी याचं अवश्य सेवन करावं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
- आहारात नियमित समावेश केल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते. डोकेदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, पित्ताशयाचे खडे या विकारांवरही मुळा उपयुक्त आहे.





