नवी दिल्ली – केंद्र सरकारने फरार हिरेव्यापारी मेहुल चोक्सी याचे नाव इंटरपोलच्या रेड नोटीस मधून काढून टाकले आहे. त्यामुळे आता तो विदेशात निर्धास्तपणे फिरू शकणार आहे. मेहुल चोक्सी याने पंजाब नॅशनल बॅंकेला 13 हजार कोटी रूपयांना फसवले असून तो विदेशात पळून गेला आहे. केंद्र सरकारच्या या कृतीबद्दल कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार टीका केली आहे. मोदींनी ना खाऊंगा ना खाने दुंगा ही घोषणा केली होती, पण त्यांची ही घोषणाही आता एक जुमला असल्याचे स्पष्ट होते आहे असेही त्यांनी म्हटले आहे. खर्गे म्हणाले की,विरोधी नेत्यांसाठी ईडी-सीबीआय, पण मोदीजींच्या ‘आमच्या मेहुल भाई’साठी इंटरपोलमधून सुटका. जेव्हा ‘बेस्ट फ्रेंड’साठी संसद ठप्प होऊ शकते, तेव्हा पाच वर्षांपूर्वी फरार झालेल्या ‘जुन्या मित्राला’ मदत कशी नाकारता येईल, असे खर्गे यांनी मोदींना उद्देशून हिंदीत ट्विटमध्ये म्हटले आहे. कॉंग्रेसने म्हटले आहे की अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) विरोधी पक्षाच्या नेत्यांचा “मोठ्या जोमाने” पाठपुरावा करत असताना, त्यांनी मेहुल चोक्सीला मात्र या कृतीने मोकाट सोडले आहे. मेहुल चोक्सी हा सध्या ऍटिगुआ या देशात राहात आहे. त्याने तेथील नागरीकत्वही विकत घेतले आहे असे सांगण्यात येते.