Red Cliff School – विशिष्ट दुकानदारांकडून शालेय साहित्य खरेदीची सक्ती आणि शुल्कवाढीच्या विरोधात पालक आणि विद्यार्थ्यांनी चोविसावाडी येथील रेड क्लिप शाळेच्या विरोधात महापालिका भवनसमोर आंदोलन केले. शाळेच्या वतीने पालकांची आर्थिक लूट केली जात असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून महापालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी पालकांनी केला. सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबत शासनाने आदेश दिलेले आहेत. असे असतानाही दिघी येथील रेड क्लिप शाळेच्या वतीने पालकांना विशिष्ट दुकानातून शालेय साहित्य खरेदी करण्यास सांगितले जाते. तसेच शाळेने सलग चार वर्ष शुल्कवाढ केली आहे. त्यामुळे चालू वर्षी शुल्क कमी करावे अशी मागणी पालकांनी केली आहे. त्यासोबतच शालेय साहित्य व गणवेशामध्ये चार वर्ष बदल नको. शाळेतील मुलांना टार्गेट करणे, चुकीचे संदेश देणे व शासनाच्या निर्णयाविरोधात काम करणाऱ्या शाळेतील गायत्री वाघमारे, मिनाक्षी नायडू, प्रियदर्शनी डोंगरे यांना निलंबित करावे. आरटीईच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शालेय साहित्य द्यावे. परीक्षेसाठी उत्तरपत्रिका शाळेने द्याव्यात. तसेच सर्व वर्गांमध्ये सीसीटीव्ही बसावावेत अशी मागणी पालकांनी केली आहे.पुणे जिल्हा विभागीय शिक्षण संचालक यांनी लेखी स्वरुपात पत्र देत शाळेवर प्रशासन बसविण्यास सांगितले आहे. असे असतानाही याकडे पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागातील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या शाळेच्या तक्रारी अनेकवेळा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शाळेला वेळोवेळी पत्र देत खुलासे घेण्यात आले आहेत. अनेक वेळा कारवाई करण्यात आली आहे. आता अंतिम कारवाई ही शाळेची मान्यता काढून घेणे ही असते. आता या शाळेची मान्यता रद्द करण्याबाबत शिक्षण संचालकांना प्रस्ताव दिला आहे. – संगीता बांगर, प्रशासन अधिकारी. शिक्षण विभाग.