PCMC Gym: महापालिकेच्या व्यायामशाळा खासगी संस्थांच्या घशात ! संस्थांकडून नागरिकांची लूट; खासगी कार्यक्रमांसाठीही वापर
PCMC Gym: महापालिकेच्या ८६ पैकी ५१ व्यायामशाळा करारावर खासगी संस्थांच्या ताब्यात; अवघ्या १० रुपयांच्या जागी नागरिकांकडून उकळले जातात हजारो रुपये.

PCMC Gym – महापालिकेने खेळाडू, विद्यार्थी, तसेच सामान्य सामान्य नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा उभारल्या आहेत. परंतु, या व्यायामशाळा खासगी संस्था आणि मंडळांच्या घशात गेल्या आहेत. महापालिकेकडून संचलित व्यायामशाळांमध्ये अवघे १० रुपये मासिक शुल्क आकारले जाते. मात्र, खासगी संस्थांकडून याच जिममध्ये हजारो रुपये घेतले जातात.
महापालिकेची जागा, महापालिकेचेच साहित्य आणि वरून देखभालीसाठी पालिकेकडून आर्थिक अनुदान घेऊनही खासगी चालक मात्र सामान्य नागरिकांची लूट करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने या खासगी संस्थांचा फावले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या एकूण ८६ व्यायामशाळा आहेत, ज्यातील ५१ व्यायामशाळा अकरा महिन्यांच्या करारावर खासगी संस्था व मंडळांना चालवण्यासाठी देण्यात आल्या आहेत. या संस्थांना महापालिकेकडून मोफत मोक्याची जागा, जिमचे सर्व आधुनिक साहित्य आणि देखभालीसाठी दरमहा दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
एवढे सर्व मिळूनही खासगी संस्थाचालकांनी या सार्वजनिक सेवांचे रूपांतर स्वतःच्या कमाईच्या धंद्यात केले आहे. दुसरीकडे, योग्य देखभाल आणि साहित्याअभावी अर्ध्याहून अधिक व्यायामशाळा तर थेट बंद पडल्या आहेत.
लूट करणाऱ्या संस्थांचे करार रद्द व्हावेत
महापालिकेच्या मालमत्तेचा बेकायदेशीर वापर व सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असतानाही महापालिकेचा क्रीडा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. काही खासगी संस्थांसाठी राजकीय पदाधिकारी व नगरसेवक वारंवार शिफारस करतात. त्यामुळे क्रीडा विभागाचे या खासगी चालकांशी साटेलोटे आहे की राजकीय दबावाखाली क्रीडा विभागाचा संपूर्ण कारभार सुरु आहे, असे प्रश्न उपस्थित होतात. ज्या व्यायामशाळा नियम धाब्यावर बसवून चालविल्या जातात. त्या संस्थांचे करार त्वरित रद्द करून त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी सातत्याने होत आहे.
“क्रिडा विभागाकडून नव्याने धोरण तयार करण्याचे काम सुरु आहे. यापूर्वीच्या धोरणात व्यायामशाळा चालविण्यास दिल्यानंतर खासगी संस्थांनी किती शुल्क आकारावे, याबाबत निश्चित काही नव्हते. या व्यतिरिक्त व्यायामशाळा चालविणाऱ्या संस्थाकडून करारनाम्यातील नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास योग्य कारवाई केली जाईल.”
– पंकज पाटील, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका






