Red alert: पुणे, रत्नागिरी, रायगडला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

पुणे : भारतीय हवामान खात्याने आज, २६ मे रोजी पुणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सचेत ॲपद्वारे प्राप्त माहितीनुसार, पुढील ३ ते ४ तासांत या जिल्ह्यांतील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या मते, नदीकाठच्या परिसरात पाणी साचण्याची भीती आहे, ज्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश देण्यात आले असून, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील शहरी भागात वाहतूक कोंडी आणि ग्रामीण भागात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि रायगडमधील किनारी भागातही वादळी वाऱ्यांचा धोका असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदी, ओढे आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, वीज पडण्याच्या शक्यतेमुळे खुले मैदान आणि झाडांखाली थांबणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेनेही पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत. यंदाचा मान्सून कोकणात दाखल झाला आहे. याच कारणामुळे मुंबई, पुणे, कोकण तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतही पाऊस झाला आहे. असे असतानाच आता पुण्यातील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी आगामी काही दिवसांत मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात शेतकऱ्यांनी तसेच चाकरमान्यांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.






