विश्रांतवाडी- विश्रांतवाडी-विमानतळ रस्त्यावरील संतोषनगरमधील शिवांश चंद्रशेखर अडागळे या दोन वर्षांच्या चिमुकल्याची “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये त्याच्या बौद्धिक कौशल्य आणि चातुर्याबद्दल नोंद झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यास चॉकलेट देत त्याचा सत्कार केला. यावेळी त्याच्या पालकांनाही विधानभवन येथे सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, युवा नेते विनोद पवार, विजय देसाई, श्रीनिवास मेखला, नचिकेत साळवी आणि संपूर्ण अडागळे कुटुंब उपस्थित होते.
शिवांश यास वयाच्या दुसऱ्या वर्षीच 23 मराठी व इंग्रजी कविता तोंडपाठ आहेत. तसेच तो 1 ते 30 पर्यंतचे इंग्रजी आकडे, संपूर्ण इंग्रजी वर्णमाला त्याच्या संबंधित शब्दासह म्हणून दाखवतो. तो 12 रंग, 37 प्राणी, 14 फळे, 12 भाज्या, 20 अवयव, 10 आकार ओळखतो व बोलून दाखवतो. एवढेच नाही तर तो इंग्रजी वर्णमालेतील ए ते झेड ही अक्षरे, 1 ते 10 इंग्रजी अंक संगणकावर टाइप करतो. त्याला 15 प्राण्यांचे आवाज काढता येतात. तो “हनोई टॉवर’ 9 सेकंदात लावतो व इंग्रजीमध्ये सांगितलेल्या 27 पेक्षा जास्त क्रिया करून दाखवतो. याव्यतिरिक्त शिवांश आठवड्याचे सर्व वार म्हणून दाखवतो, वाहनांचे वेगवेगळे भागही त्यास ओळखता येतात. त्याच्या या सर्व गुणांची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.