Pune News : माऊलींच्या पालखी मार्गावर पाणीच पाणी; वारकऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना

विश्रांतवाडी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे उद्या (दि. २०) पुणे शहरात आगमन होत आहे. मात्र, पालखी मार्गावरील कळस कुसमाडेवस्ती येथे पावसाचे पाणी साचून रस्त्याने तळ्याचे स्वरूप घेतले आहे. पुणे महापालिकेने पालखी स्वागताची जय्यत तयारी केल्याचा दावा केला असला, तरी पाणी साचण्याच्या ठिकाणी पुरेशा उपाययोजना न केल्याने वारकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कळस येथील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले असून, सुमारे १५० ते २०० मीटर रस्ता पूर्णपणे जलमय झाला आहे. महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने पावसाळापूर्व कामे आणि नाल्यांची साफसफाई व्यवस्थित न केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी उभारलेली यंत्रणाही अपुरी ठरत आहे. यामुळे वारकऱ्यांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मलनिस्सारण यंत्रणेची कमतरता
मलनिस्सारण विभागाचे कनिष्ठ अभियंता अक्षय वाडेकर म्हणाले, “कळस येथील पावसाळी वाहिन्यांची रुंदी कमी आहे, आणि चेंबर खचला आहे. चेंबरखाली उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या असल्याने दुरुस्तीला अडचणी येत आहेत. सध्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे.”
साफसफाईचा दावा फोल, आयुक्तांकडे कारवाईची मागणी
पुणे महापालिका दरवर्षी नाले आणि पावसाळी वाहिन्यांच्या साफसफाईसाठी कोट्यवधींची निविदा काढते, परंतु साफसफाई केवळ कागदावरच होते. यामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. पालखी मार्गावरील पाणी साचण्याच्या समस्येमुळे वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी नवीन पालिका आयुक्तांनी मलनिस्सारण आणि देखभाल दुरुस्ती विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी आणि कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.





