गणपत शेठच्या नादाला लागू नकोस, तुझा बाबा सिद्दिकी होईल; महेश गायकवाडांना लग्नसमारंभात धमकीचे पत्र

मुंबई : मुंबईच्या उल्हासनगर पोलीस ठाण्यात भाजप माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यात झालेला वाद चर्चेचा विषय बनला होता. पोलीस ठाण्यातच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणानंतर माजी आमदार गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत.
दरम्यान, गणपत गायकवाड आणि वैभग गायकवाडच्या नादाला लागू नकोस नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी होईल असे धमकीचे पत्र कल्याणच्या महेश गायकवाड यांना आले आहे. हे पत्र जेलमधून भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनीच पाठवल्याचे आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका लग्नसमारंभात हे पत्र देवून धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
माजी नगरसेवक महेश गायकवाड हे तीन दिवसापूर्वी अंबरनाथमध्ये एका लग्न सभारंभासाठी गेले होते. त्यावेळी एक तरुण त्यांच्याजवळ आला आणि त्याने एक लिफाफा त्यांच्या हातात दिला. अनेक नागरिक समस्या घेऊन येतात. त्यामुळे समस्यांचे पत्र असेल असे समजून तो लिफाफा महेश गायकवाड यांनी घेतला. लिफाफा उघडून पाहिला तर त्यात गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचे नाव घेऊ नको, नाहीतर तुझा बाबा सिद्धीकी करु असा मजकूर लिहिला होता. ज्या कागदावर ही धमकी दिली गेली आहे. तो कागद जेलमध्ये वापरला जात असल्याचा दावा महेश गायकवाड यांनी केला आहे. या प्रकरणी अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
गणपत गायकवाड यांच्याकडून महेश गायकवाडवर गोळीबार
भाजपचे कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे त्यावेळचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता. ही घटना 2 फेब्रुवारी 2024 रोजी घडली होती. या गोळीबारात महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार जखमी झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांना अटक केली होती. त्यापैकी तीन जण जामीनावर सुटले आहेत. माजी आमदार गायकवाड यांचा जामीन अर्ज नुकताच कल्याण न्यायालयाने फेटाळला आहे.





