धक्कादायक…! दारूसाठी पैसे न दिल्याने घरात शिरून मारहाण; १९ वर्षीय मुलीचा मृत्यू

कल्याण : कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून शेजाऱ्याच्या घरात शिरून कुटुंबीयांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सानिया सय्यद असे मृत तरुणीचे नाव आहे. महात्मा फुले पोलिसांनी हल्ला करणाऱ्या पाच जणांना तत्काळ अटक केली.
गुलाम शेख ऊर्फ मुन्ना शेख, त्याचा मुलगा अब्दुल शेख आणि त्याचे सहकारी शोएब शेख, अजिज शेख, शाहिद शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशा कि, कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद हे पत्नी व मुलीसह राहतात. भाजीविक्रीचा व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी रात्री याच परिसरात राहणारा गुलाम शेख निसारकडे आला. त्याने दारूसाठी पैसे मागितले, मात्र त्यांनी नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर निसार आपल्या घरी निघून गेले. रात्री दहाच्या सुमारास ते जेवण करत असताना गुलाम शेखचा मुलगा अब्दुल शेख हा मित्रांसह त्यांच्या घरी आला.
वडिलांसोबत झालेल्या वादाचा जाब विचारत त्याने निसार यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण सुरू केली. यावेळी निसार यांची पत्नी झुलेखा व मुलगी सानिया या दोघीही त्यांना सोडवण्याकरता आल्या, मात्र त्यांनी दोघींनाही मारहाण केली. यामध्ये सानियाचा लाकडी दांडक्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
गुलाम शेख ऊर्फ मुन्ना शेख, त्याचा मुलगा अब्दुल शेख आणि त्याचे सहकारी शोएब शेख, अजिज शेख, शाहिद शेख या पाच जणांना बेड्या ठोकल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण घेटे यांनी दिली.



