खराडी येथील फार्मसी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचालित खराडी येथील शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मासुटिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर येथे भारताचे थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर अशोक भोसले यांच्या अभिवादनाने झाली. या प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर विजया बर्गे, पदविका विभाग प्रमुख डॉक्टर अश्विनी शेवाळे, डॉक्टर सुजित काकडे, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांचे जीवनपट आणि प्रेरणा
महाविद्यालयातील विद्यार्थिनी पायल राणीत आणि कुणीका देव सरकार यांनी डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे विद्यार्थी प्रेम आणि त्यांचे भारत महासत्ता होण्यासाठी असलेले योगदान यावर आपले विचार व्यक्त केले.
त्यानंतर, प्राचार्य डॉक्टर अशोक भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर कलाम यांच्या जयंतीला ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचे महत्व सांगितले. त्यांनी डॉक्टर कलाम यांच्या जीवनशैलीचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिश्रम, जिद्द, आणि विज्ञानाची आवड या गुणांचा आदर्श घ्यावा असे मत मांडले. पदविका विभाग प्रमुख डॉक्टर अश्विनी शेवाळे यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार देत नेहमीच आपले ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
वाचनाचे महत्व आणि कार्यक्रमाची सांगता
कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी पुस्तक वाचन केले. हा संपूर्ण कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर अशोक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या ग्रंथपाल सविता सोनवणे यांनी केले, तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि प्राध्यापिका तृप्ती शहा यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापिका रुचिता भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले.





