विद्यापीठ चौक दुमजली उड्डाणपूल खांबाच्या आराखड्याचे फेरनियोजन

पुणे : वाहतुकीला अडथळा ठरू नये म्हणून पुणे विद्यापीठ चौकात उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाचे, तसेच शिवाजीनगर स्टेशनजवळील आकाशवाणी चौकातील मेट्रोच्या खांबांचे आराखडांचे फेरनियोजन करण्याचा निर्णय पुणे महापलिका आणि पीएमआरडीएने एकत्रितपणे घेतला.
हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान इलेव्हेटेड मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. त्यासाठी पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले आहे. या मेट्रो प्रकल्पाचे आराखडे पीएमआरडीएकडून नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महापालिकेला सादर केले होते. त्यामध्ये विद्यापीठ चौकात उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपूलासाठीचा खांब चौकात मध्यभागी येत होता. तसेच आकाशवाणी चौकातही मेट्रो प्रकल्पाचा खांब मध्यभागी येत होता. हे खांब अडीच बाय अडीच मीटरचे असल्यामुळे त्यातून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो, असे निरीक्षण महापालिकेकडून नोंदविण्यात आले होते.
त्यावर बुधवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, पुणे महानगर नियोजनकार विवेक खरवडकर यांच्यासह टाटा-सिमेन्स या कंपनीचे अधिकारी यांनी एकत्रित पाहणी केली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.





