RCB vs SRH : मैदानावर आरसीबीचा नवा प्रवास, पण ११ चाहत्यांच्या आठवणी कायम! ‘त्या’ ११ जागांवर आता कधीच कोणी बसणार नाही
RCB vs SRH : गेल्या वर्षीच्या भीषण दुर्घटनेनंतर खबरदारीचे सर्व उपाय योजून सरकारने अखेर या मैदानावर सामन्यांना परवानगी दिली आहे.

RCB 11 Fans Tribute Chinnaswamy Stadium : गेल्या वर्षी ४ जून रोजी आरसीबीच्या विजयोत्सवा दरम्यान झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेच्या जखमा अजूनही ताज्या असतानाच, आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२६ चा श्रीगणेशा झाला आहे. या सामनापूर्वी मृतांच्या सन्मानार्थ आरसीबी आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने (KSCA) एक ऐतिहासिक निर्णय घेतला.
स्मारक पट्टिकेचे अनावरण –
चिन्नास्वामी स्टेडियमवर त्या ११ क्रिकेट चाहत्यांच्या आठवणीत एक विशेष ‘स्मारक पट्टिका’ बसवण्यात आली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या हस्ते या पट्टिकेचे अनावरण करण्यात आले. “केएससीएने सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक सुधारणा केल्या आहेत. पोलीस आणि तज्ज्ञ समितीने या उपायांवर समाधान व्यक्त केल्यानंतरच २८ मार्चच्या सामन्याला परवानगी देण्यात आली आहे,” असे गृहमंत्री यावेळी म्हणाले. स्मारक पट्टिकेचे अनावरण केल्यानंतर सामन्यापूर्वी सर्वांनी दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर सामन्यात दोन्ही संघ हातावर काळी पट्टी बांधून उतरले.
RCB TEAM, SRH TEAM & WHOLE CHINNASWAMY 2 MINUTES SILENCE AS TRIBUTE TO 11 FANS. 🙏❤️ pic.twitter.com/oeuPqnNFvD
— Tanuj (@ImTanujSingh) March 28, 2026
११ जागांवर कधीच कोणी बसणार नाही!
Royal Challengers Bengaluru will pay tribute to the eleven individuals who tragically lost their lives in the stampede on June 4.
As a mark of respect, RCB players will wear practice jerseys bearing the number 11 during warm-up, followed by black armbands during the team’s… pic.twitter.com/UMsvtkTDa7
— Sportstar (@sportstarweb) March 28, 2026
केएससीए आणि आरसीबीने घेतलेल्या संयुक्त निर्णयानुसार, स्टेडियममधील एका प्रमुख स्टँडमधील ११ जागा (Seats) कायमस्वरूपी रिकाम्या ठेवल्या जाणार आहेत. केवळ आयपीएलच नव्हे, तर आगामी सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही या जागांवर कोणालाही बसता येणार नाही. ही त्या मृतांना दिलेली एक मूक श्रद्धांजली असेल.
आरसीबीचे दोन ‘होम ग्राऊंड’
यंदा आरसीबी आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच बेंगळुरूमध्ये ५ सामने खेळणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी उर्वरित दोन घरगुती सामने रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित केले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या घटनेनंतर चिन्नास्वामीकडून महिला विश्वचषकाचे यजमानपदही हिरावून घेण्यात आले होते, मात्र आता नव्या सुरक्षा नियमांसह हे मैदान पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.





