RCB vs DC : टिम डेव्हिडचा नवा पराक्रम! पूरन-कार्तिकला मागे टाकत बनला नंबर वन फलंदाज

Tim David become highest run scorer in last five overs of IPL since 2022 : चिन्नास्वामी मैदानावर शेवटच्या षटकांमध्ये टिम डेव्हिडने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीने कहर केला. डेव्हिडने २० चेंडूत ३७ धावांची जलद खेळी केली, ज्यामध्ये डावाच्या शेवटच्या षटकात १९ धावा कुटल्या होत्या. त्याच्या खेळीदरम्यान, टिमने १८५ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करताना २ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार मारले. याससह त्याने एक खास पराक्रम करत एकाच झटक्यात अनेक महान खेळाडूंना मागे टाकले आहे.
टिम डेव्हिडने केला खास विक्रम –
डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये टिम डेव्हिडने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. डेव्हिडने आयपीएल २०२२ नंतर या लीगमध्ये १६ ते २० षटकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने शिमरॉन हेटमायर, दिनेश कार्तिक, निकोलस पूरन सारख्या स्फोटक फलंदाजांना मागे टाकले आहे. त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ७ गडी गमावून १६३ धावा केल्या.
WELL PLAYED, TIM DAVID. 🌟
– 37* (20) with 2 fours and 4 sixes. A great finish by David, he put a respectable total on board for RCB. pic.twitter.com/huo8T8g2vu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 10, 2025
२०२२ पासून आयपीएलमध्ये १६ ते २० षटकांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
६३० – टिम डेव्हिड (स्ट्राईक रेट १९५.०४)
६०९ – शिमरॉन हेटमायर (स्ट्राईक रेट १७७.०३)
६०७ – दिनेश कार्तिक (स्ट्राईक रेट १९५.१७)
५८५ निकोलस पूरन (स्ट्राईक रेट १८०.५५)
५४७ – डेव्हिड मिलर (स्ट्राईक रेट १६९.८७)
डेव्हिडचा स्ट्राईक रेटही राहिलाय सर्वाधिक –
गेल्या पाच षटकांमध्ये डेव्हिडचा स्ट्राईक रेटही सर्वाधिक राहिला आहे. आरसीबीच्या या फलंदाजाने शेवटच्या षटकांमध्ये १९५ च्या स्ट्राईक रेटसह कहर केला आहे. या दरम्यान मिचेल स्टार्कने आरसीबीविरुद्ध त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात महागडे षटक टाकले. स्टार्कने एकाच षटकात ३० धावा दिल्या. स्टार्कच्या षटकात फिल सॉल्टने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.
मिचेल स्टार्कने एका षटकात दिल्या ३० धावा –
सॉल्टने एका शक्तिशाली षटकाराने षटकाची सुरुवात केली. त्याच वेळी, सॉल्टने पुढच्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारले. स्टार्कने टाकलेला तिसरा चेंडू नो बॉल होता, जो सॉल्टने सीमारेषेपलीकडे पाठवला. स्टार्कच्या पुढच्या दोन चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार आला. अशा प्रकारे या षटकात ३० धावा आल्या. यासह स्टार्कने आयपीएल २०२५ मधील सर्वात महागडे षटकही टाकले.





