PBKS vs RCB : आरसीबी ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ! पंजाबचा किंग्ज संघाचा सलग सहावा पराभव
PBKS vs RCB : आरसीबी चालू हंगामात प्लेऑफमध्ये अधिकृतपणे पात्र ठरणारा पहिला संघ बनला आहे.

PBKS vs RCB Royal Challengers Bengaluru Qualify : आयपीएल २०२६ च्या ६१ व्या रोमांचक सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा २३ धावांनी पराभव केला. हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला मैदानात मिळालेल्या या दणदणीत विजयामुळे आरसीबी चालू हंगामात प्लेऑफमध्ये अधिकृतपणे पात्र ठरणारा पहिला संघ बनला आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सचा हा सलग सहावा पराभव असून त्यांचे स्पर्धेतील आव्हान आता जवळपास संपुष्टात आले आहे. या सामन्यात पंजाबने टॉस जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते.
विराट कोहलीचा संयम अन् व्यंकटेश अय्यरचा झंझावात –
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच षटकात जेकब बेथल (११ धावा) बाद झाला. यानंतर विराट कोहलीने देवदत्त पडिक्कलच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करत डाव सावरला. पडिक्कल ४५ धावांवर बाद झाल्यानंतर विराटने व्यंकटेश अय्यरसोबत ६० धावा जोडल्या. विराट कोहली ३७ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून बाद झाला.
The 𝘁𝗶𝘁𝗹𝗲 𝗱𝗲𝗳𝗲𝗻𝗰𝗲 is ON! 🏆
Reigning champions @RCBTweets become the 1⃣st team to enter the #TATAIPL 2026 Playoffs 😎 ❤️
Scorecard ▶️ https://t.co/3u5qL0Zn75#KhelBindaas | #PBKSvRCB pic.twitter.com/1XAjPzeHnV
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2026
विराटच्या विकेटनंतर व्यंकटेश अय्यरने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने अवघ्या ४० चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७३ धावांची स्फोटक खेळी केली. त्याला टिम डेव्हिडने (२८ धावा) चांगली साथ दिल्याने आरसीबीने २२२ धावांचा विशाल डोंगर उभा केला.
पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई –
आरसीबीच्या फलंदाजांसमोर पंजाबच्या गोलंदाजांची पुरती दाणादाण उडाली. लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रतिषटक १४ च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्या, तर अर्शदीप सिंग आणि शशांक सिंगने १० च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. पंजाबकडून हरप्रीत बरारने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर अर्शदीप आणि चहलला प्रत्येकी १-१ विकेट्स मिळाली.
पंजाबची झुंज अपयशी –
प्रत्युत्तरात २२३ धावांच्या अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्सचा संघ निर्धारित २० षटकांत ८ विकेट्स गमावून १९९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. पंजाबच्या फलंदाजांनी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु आरसीबीच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर धावसंख्येचा वेग राखण्यात ते अपयशी ठरले. पंजाबकडून शशांक सिंगने सर्वाधिक ५६ धावांचे योगदान दिले. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर आरसीबीने २३ धावांनी बाजी मारत प्लेऑफचे तिकीट मिळवलं.





