RCB Home Ground : आरसीबीच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! IPL 2026 साठी ‘हे’ स्टेडियम असणार ‘होम ग्राऊंड’

RCB Home Ground Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएल २०२६ साठी आरसीबीचे होम ग्राउंड कोणते असणार, यावर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कर्नाटक सरकारने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल सामने आयोजित करण्यासाठी अधिकृत मंजुरी दिली आहे.
गेल्या वर्षीच्या दुर्घटनेनंतर होती बंदी –
४ जून २०२५ हा दिवस आरसीबीच्या इतिहासातील सुवर्णक्षण होता, कारण संघाने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. मात्र, या विजयाचा जल्लोष दुर्दैवी ठरला. स्टेडियमबाहेर जमलेल्या लाखो चाहत्यांच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ११ निष्पाप चाहत्यांचा मृत्यू झाला होता. या भीषण घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव स्टेडियमवर सर्व मोठ्या सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती.
केएससीएकडून सुरक्षेचे आश्वासन –
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (KSCA) स्पष्ट केले आहे की, सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. असोसिएशनने तज्ज्ञ समितीसमोर सुरक्षेचा आणि गर्दी व्यवस्थापनाचा सविस्तर ‘रोडमॅप’ सादर केला आहे. स्टेडियममधील प्रेक्षकांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
आरसीबीने ठेवला हा प्रस्ताव:
- एआय तंत्रज्ञान: ३०० ते ३५० एआय कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव.
- खर्चाची जबाबदारी: या उपक्रमाचा ४.५० कोटी रुपयांचा संपूर्ण खर्च आरसीबी उचलणार आहे.
- फायदा: या कॅमेऱ्यांमुळे गर्दीचे व्यवस्थापन, रांगांचे नियोजन, प्रवेश आणि बाहेर पडणाऱ्या लोकांची रिअल-टाइम देखरेख आणि अनाधिकृत प्रवेश रोखणे सोपे होईल.
वर्ल्ड कप मुकला, पण आयपीएलची मेजवानी मिळणार –
चिन्नास्वामी स्टेडियमवरील बंदी आता उठली असली, तरी या मैदानाचे नाव टी-२० विश्वचषक २०२६ च्या यजमान शहरांच्या यादीत नाही. वर्ल्ड कपचे वेळापत्रक आधीच ठरल्यामुळे बंगळुरूच्या चाहत्यांना जागतिक स्पर्धेला मुकावे लागणार आहे. मात्र, आयपीएल २०२६ मध्ये आरसीबी संघ याच मैदानावर खेळणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.





