RBI Deputy Governor : स्पर्धेमुळे काही बँकांकडून नैतिकतेचा बळी; रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन यांनी व्यक्त केले मत

मुंबई : भारतातील बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रात कमालीची स्पर्धा वाढली आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि लघु पल्ल्यात जास्त नफा मिळविण्यासाठी काही बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था अयोग्य मार्गाचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत आहे, असे मत रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन जे. यांनी व्यक्त केले आहे.
खासगी क्षेत्रातील करूर वैश्य बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त तामिळनाडूतील करूर येथे बोलताना स्वामीनाथन यांनी सांगितले की, बर्याच बँकांच्या व्यवस्थापनाला नफ्यासाठी वाटेल ते केले तरी चालते असे वाटत आहे. मात्र अशा बँकांनी हे ध्यानात घेतले पाहिजे की, नैतिकतेचा बळी दिल्यानंतर दीर्घ पल्ल्यात बँकेच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो. लोकांची बँकेबाबतची सकारात्मक भावना डळमळीत होते. बँकिंग व्यवस्थेच्या मूलभूत तत्वाबाबत बँकांनी तडजोड करू नये असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
काही बँका क्रिएटिव्ह अकाउंटिंगच्या विचारसरणीला बळी पडत आहेत. तसेच रिझर्व बँकेच्या नियमांचा जास्त उदार होऊन अर्थ काढत आहेत. अंतर्गत नियंत्रण प्रणालीकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा परिस्थितीत दीर्घ पल्ल्यात या बँकांच्या प्रतिष्ठेवर परिणाम होत असतो असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले की, बँकांना नफा कमविण्याचा निश्चित अधिकार आहे.
मात्र बँकिंग व्यवस्था. ग्राहक आणि संबंधित प्रक्रियांच्या चौकटीतच बँकांच्या संचालक मंडळांनी स्वतःला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा संबंधित बँकेबरोबरच बँकिंग व्यवस्थेचे नुकसान होण्याचा धोका असतो. बँकिंग व्यवस्थेने दीर्घकाळ नैतिक चौकटीत काम केल्यामुळेच ग्राहकांचा आणि जनतेचा बँकिंग व्यवस्थेवर विश्वास असतो. मात्र लघु पल्यातील फायद्यासाठी अयोग्य काम केल्यानंतर या विश्वासाला तडा जाण्याची भीती असते.
बँकांवर अनेक जबाबदार्या
बँकिंग व्यवस्था काळाच्या ओघात कमालीची बदलत आहे. अशा परिस्थितीत नवे तंत्रज्ञान वेळेत स्वीकारावे लागते. त्याचबरोबर हे तंत्रज्ञान कर्मचार्यांनी स्वीकारावे यासाठी प्रयत्न करावे लागतात. या बाबी 1916 पासून केल्यामुळे करूर बँक आता शतकोत्तर वाटचाल करीत आहे असे त्यांनी सांगितले.




