MPC meeting: बँक ग्राहकांच्या सुरक्षेसाठी RBIचा मोठा निर्णय; फसवणूक आणि ‘मिस-सेलिंग’ला बसणार लगाम
MPC meeting: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. विशेष म्हणजे, आरबीआयने यंदा 'रेपो रेट' ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे.

MPC meeting: बँक ग्राहकांचे हित जपण्यासाठी आणि वाढत्या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी कडक पावले उचलली आहेत.
‘मिस-सेलिंग’ (चुकीची माहिती देऊन उत्पादन विकणे) रोखणे, अनधिकृत व्यवहारांमधील ग्राहकांचे नुकसान मर्यादित करणे आणि कर्ज वसुलीसाठी बँकांकडून होणारा त्रास कमी करणे, यावर आरबीआयने आपला भर दिला आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra ) यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. विशेष म्हणजे, आरबीआयने यंदा ‘रेपो रेट’ ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे.
ग्राहकांसाठी ‘सुरक्षा कवच’ –
आरबीआयने ग्राहकांच्या हितासाठी तीन महत्त्वाच्या मसुद्यांची (Draft Rules) घोषणा केली आहे:
१. मिस-सेलिंगवर बंदी: ग्राहकांना नको असलेली किंवा चुकीची माहिती देऊन विमा किंवा इतर आर्थिक उत्पादने गळ्यात मारणाऱ्या बँकांवर आता कडक कारवाई होईल.
२. वसुली एजंटवर नियंत्रण: बँकांनी कर्ज वसुलीसाठी नियुक्त केलेल्या एजंटना आता नियमात राहूनच काम करावे लागेल. ग्राहकांना धमकावणे किंवा त्रास देणे याला चाप बसणार आहे.
३. डिजिटल फसवणुकीत भरपाई: लहान मूल्याच्या फसव्या व्यवहारांसाठी ग्राहकांना २५,००० रुपयांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष खबरदारी –
डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी आरबीआय ‘डिस्कशन पेपर’ प्रसिद्ध करणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवहारांची अतिरिक्त पडताळणी (Additional Authentication) आणि काही विशिष्ट व्यवहारांसाठी थोडा वेळ (Lagged Credits) घेण्यासारख्या उपाययोजना सुचवल्या आहेत, जेणेकरून फसवणूक झाल्यास वेळीच व्यवहार थांबवता येईल.
लघु उद्योजक आणि गृहकर्जाला दिलासा –
विनातारण कर्ज: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) विनातारण कर्जाची मर्यादा १० लाख रुपयांवरून वाढवून २० लाख रुपये करण्यात आली आहे.
सहकारी बँका: नागरी सहकारी बँकांसाठी गृहकर्जाच्या नियमात सवलत देण्यात आली आहे. तसेच, १४०,००० बँक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी ‘मिशन सक्षम’ मोहीम राबवण्यात येणार आहे.
९ फेब्रुवारीपासून वित्तीय साक्षरता सप्ताह –
येत्या ९ फेब्रुवारीपासून देशभरात ‘वित्तीय साक्षरता सप्ताह’ पाळला जाईल. यंदाची थीम ‘KYC – सुरक्षित बँकिंगसाठी तुमचे पहिले पाऊल’ अशी आहे. गव्हर्नर मल्होत्रा यांनी सर्व बँकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले असून ग्राहकांनी सुरक्षित बँकिंगसाठी जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे.
J&K Budget 2026: जम्मू-काश्मीरचा 1.27 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर; मोठ्या घोषणा जाणून घ्या…






