Team India : रवींद्र जडेजा हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज – रवीचंद्रन अश्विन

चेन्नई – बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रविचंद्रन अश्विनने आपला देशबांधव रवींद्र जडेजाचे कौतुक करत त्याला ‘भारतीय संघातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक’ म्हटले आहे.
अश्विनने म्हटले आहे की, रवींद्र जडेजा हा प्रेरणादायी खेळाडू आहे. कधीकधी तुम्ही सहकारी क्रिकेटपटूसोबत शर्यतीतीत असता, त्यावेळी जडेजा त्याचे काम चोखपणे करत असतो. अनेक लढतीमध्ये तो आपल्याला देखील चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देतो. त्यामुळे संघात जडेजाचे महत्वपूर्ण स्थान असल्याचे रवीचंद्रन अश्विनने अष्टपैलू रवींद्र जडेजाविषयी बोलताना सांगितले.
“तो खूप प्रेरणादायी आहे. गेल्या तीन-चार वर्षांत अनेक प्रसंगी, जेव्हा तो फलंदाजीला येतो तेव्हा मला खूप शांत आणि संयमित वाटतं. आम्हाला कोणत्या प्रकारची गोलंदाजी हवी आहे याची आम्हाला समज आहे. जडेजा हा भारतीय संघातीलच नाही तर सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.”
तो पुढे म्हणाला, “त्याच्याकडे चांगली खेळ योजना आहे आणि सध्या तो एक विश्वासार्ह फलंदाज आहे. ड्रेसिंग रूममध्ये येताच तो वातावरण शांत करतो आणि कठीण प्रसंगी त्याने मला मदत केली आहे. आमच्यात बरेच साम्य आहे आणि मला वाटते की आम्ही मैदानावर आणि मैदानाबाहेर एकमेकांच्या सोबतीचा आनंद घेत आहोत”
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या लढतीमध्ये भारताच्या आघाडीच्या फळीने निराशा केली होती. त्यावेळी भारताच्या 144 धावांवर सहा गडी बाद झाले होते. त्यावेळी रवींद्र जडेजा आणि अश्विन यांनी सहाव्या गड्यासाठी 199 धावांची भागीदारी करताना भारताला 376 धावांपर्यंत मजल मारून दिली होती. या खेळीमध्ये रवींद्र जडेजाने 86 धावांची दमदार खेळी केली होती. अश्विनने शतक झळकावताना भारताला सुस्थितीत आणले होते. त्यामुळे भारताला या पहिल्या डावात 227 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली होती. रवींद्र जडेजाने गोलंदाजी करताना देखील पाच गडी बाद केले.
अश्विन आणि जडेजा एकमेकांना चांगलीच मदत करतात. जडेजा असल्याचा फायदा थोडा जास्त फायदा अश्विनला झाला. चेंडूवर नियंत्रण चांगले असल्याने जडेजा सपाट खेळपट्टीवर देखील धावा देण्यास कंजूसी करतो, त्यामुळे समोरच्या फलंदाजानावर दबाव निर्माण होतो. याचा फायदा सर्वाधिक अश्विनला झाला असल्याचे भारताच्या डावखुऱ्या फिरकीपटूने बोलताना सांगितले.
जडेजा-अश्विनची कामगिरी
सन 2012 मध्ये रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची जोडी तयार झाली. या दोघांनी मायदेशाता आतापर्यंत 45 लढती एकत्र खेळल्या आहेत. यापैकी 34 लढतीत विजय मिळाला असून 3 लढतीत पराभव तर 8 लढती अनिर्णित राहिल्या आहेत. या 45 सामन्यांमध्ये जडेजाने 218 तर अश्विनने 263 गडी बाद केले आहेत.
300 बळींच्या टप्प्यावर
येत्या 27 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या लढतीमध्ये 300 गडी बाद करण्यासाठी रवींद्र जडेजाला केवळ 1 बळीची आवश्यकता आहे. त्याने कसोटीमध्ये 3122 धावा केल्या आहेत. त्यामुळे 300 गडी व 3000 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत केवळ अश्विन आणि कपिल देव यांचा समावेश आहे. बांगलादेश विरुद्ध 1 गडी बाद केल्यास रवींद्र जडेजाचा समावेश देखील या यादीत होणार आहे.





