Maharashtra : भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज अजिंक्य रहाणे हा गेल्या अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. एका बाजूला तो आयपीएल आणि काउंटी क्रिकेटमध्ये सक्रीय दिसत असला तरी त्याच्यासाठी संघातील परतीचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. तो किती वर्षे क्रिकेट खेळणार याचं उत्तर अजून गुलदस्त्यात असलं तरी निवृत्तीनंतर तो काय करणार यासंदर्भातील त्याचा भविष्यातील मेगा प्लान ठरला आहे.
सोमवारी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याला सूसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रे परिसरात भूखंड देण्यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
दरम्यान, याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवरच अजिंक्य रहाणे याने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमत्र्यांसह बीसीसीआय खजीनदार यांचे विशेष आभार व्यक्त करणारी पोस्ट ट्विटरवर(एक्स) शेअर केली आहे. मुंबईत जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी आणि क्रीडा सुविधा उभारण्याच्या संकल्पनेला पाठिंबा दिल्याबद्दल त्याने आभार व्यक्त केले आहेत.
ही अकादमी युवा खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा आणि मार्गदर्शनासह सक्षम करेल, ज्या शहरात माझा स्वतःचा क्रिकेट प्रवास सुरू झाला त्या शहरातील चॅम्पियन्सच्या पुढच्या पिढीला प्रोत्साहन मिळेल. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी तुमच्याकडून देण्यात आलेल्या प्रोत्साहन आणि नेतृत्वाबद्दल मी कृतज्ञ आहे, अशा शब्दांत अजिंक्य रहाणे याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मंत्रीमंडाळात काय झाला निर्णय….
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रे येथील भूखंड देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
वांद्रे रिक्लमेशन येथील 2 हजार चौरस मीटरचा भूखंड हा रहाणे यांना तीस वर्षांकरिता भाडेपट्ट्याने देण्यात येईल. यापूर्वी हा भूखंड क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना इनडोअर क्रिकेट प्रक्षिशण केंद्रासाठी 1988 मध्ये वितरित करण्यात आला होता. मात्र या भूखंडावर कोणतेही काम न झाल्याने शासनाने तो परत घेतला आहे. या भूखंडाची सद्याची परिस्थिती वाईट असून, आसपासचे झोपडीधारक अनावश्यक कामांसाठी याचा वापर करत आहेत. त्यानंतर म्हाडा प्राधिकरणाने ठराव करून हा भूखंड माजी कर्णधार अजिंक मधुकर रहाणे यांना देण्याची शिफारस केली.