ICC Test Rankings 2024 (Bowling) : न्यूझीलंडविरूध्दच्या भारताच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर आयसीसीने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत दोन अर्धशतके झळकावल्याचा फायदा झाला आहे. पंत आयसीसी कसोटी क्रमवारीत पाच स्थानांनी झेप घेत जगातील सहावा कसोटी फलंदाज ठरला आहे, तर गोलंदाजी क्रमवारीत फिरकीपटू रवींद्र जडेजाही गोलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोललो तर, रवींद्र जडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दोन्ही डावात पाच बळी घेत दोन स्थानांनी झेप घेतली आहे आणि जागतिक कसोटी गोलंदाजांमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे आता 802 रेटिंग गुण आहेत.
भारताचा सर्वोच्च क्रमांकाचा कसोटी गोलंदाज जसप्रीत बुमराह 838 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. रविचंद्रन अश्विनची एका स्थानानं घसरण झाली असून तो आता पाचव्या क्रमांकावर आहे. तर अन्य भारतीयामध्ये वॉशिंग्टन सुंदरने सात स्थानांची प्रगती करत कसोटी गोलंदाजांमध्ये 46वे स्थान मिळवलं आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने गेल्याच आठवड्यात आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराहला मागे टाकले होते आणि तो 872 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्स यांच्या पुढे दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज एजाज पटेल (12 स्थानांची प्रगती ) आणि ईश सोधी (तीन स्थानांची प्रगती) अनुक्रमे 22 व्या आणि 70 व्या स्थानावर आहेत.