ICC Test Rankings 2024 : न्यूझीलंडविरूध्दच्या भारताच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत 60 धावांची खेळी करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला क्रमवारीत फायदा झाला आहे. त्याचवेळी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मोठा फटका बसला आहे. किंग कोहली आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील टॉप-20 मधून बाहेर पडला आहे.
अलीकडेच, न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने भारतासाठी 60 आणि 64 धावा केल्या होत्या. या कामगिरीनंतर पंतला आयसीसीकडून बक्षीस मिळाले आहे. पंतने ताज्या आयसीसी क्रमवारीत पाच स्थानांनी झेप घेतली आणि आता तो 750 गुणांसह जगातील सहाव्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज बनला आहे.
भारतीय संघाची सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालची आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. मुंबई कसोटीत त्यानं निराशाजनक कामगिरी केली होती, त्यामुळे त्याची एका स्थानानं घसरण झाली आहे. याशिवाय शुभमन गिलची फलंदाजांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात गिलने 90 धावा केल्या, त्यानंतर त्याने आयसीसी क्रमवारीत चार स्थानांनी झेप घेत 16वे स्थान गाठले आहे.
Rishabh Pant and Daryl Mitchell move into the top 10 after the recent #INDvNZ series 🙌 pic.twitter.com/D1wyVSMegM
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 6, 2024
कोहलीची प्रथमच घसरण….
दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीची बॅट शांत राहिली. या कमकुवत कामगिरीमुळे विराट कोहली टॉप-20 मधून बाहेर पडला आहे. 2024 मध्ये आतापर्यंत केवळ दोन अर्धशतके झळकावणाऱ्या कोहलीची 8 स्थानांनी घसरण झाली असून तो आता 22 व्या क्रमांकावर आहे. त्याचे 655 रेटिंग गुण आहेत. उल्लेखनीय आहे की 10 वर्षांनंतर विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप-20 मधून बाहेर पडला आहे. यापूर्वी डिसेंबर 2014 मध्ये त्याला टॉप-20 फलंदाजांमध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर सलग 10 वर्षे विराटचा दबदबा कायम राहिला, मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याची बॅट शांत आहे आणि तो क्रमवारीत सातत्याने मागे पडत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माही दोन स्थानांनी घसरल्याने 26व्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतही रोहितची बॅट शांत राहिली. तोही धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसला.
जो रूट अव्वल स्थानी कायम…
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे 903 गुण आहेत. न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या तर इंग्लंडचा हॅरी ब्रूक तिसऱ्या स्थानावर आहे. भारताची युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल 777 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचे 757 गुण आहेत.