Ravindra Jadeja Century : ‘सर’ रवींद्र जडेजाचा धमाका! रणजी ट्रॉफीत ठोकले १६ वे प्रथम श्रेणी शतक; जुन्या साथीदारानेच केली शिकार
Ravindra Jadeja Century : रवींद्र जडेजाने शानदार फलंदाजी करत रणजी ट्रॉफीमध्ये आपले शतक पूर्ण केले. प्रेरक मांकडनेही शतक झळकावले. देव आदित्य सिंगने छत्तीसगडकडून पाच विकेट्स घेतल्या.

Ranji Trophy Saurashtra vs Chhattisgarh Ravindra Jadeja Century 102 Runs : देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडू देखील मैदानात उतरले आहेत. सौराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यात एलिट ग्रुप ‘ब’ मधील सामन्यात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) बॅटने अप्रतिम कामगिरी करून दाखवली आहे. कठीण परिस्थितीत अत्यंत संयमी फलंदाजी करत जडेजाने शानदार शतक झळकावले. त्याच्या या शतकाच्या जोरावर सौराष्ट्र संघाने पहिल्या डावात ३९२ धावांचा मजबूत डोंगर उभा केला आहे.
२०९ चेंडूंत १०२ धावा; प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १६ वे शतक!
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सौराष्ट्रसाठी रवींद्र जाडेजाने मधल्या फळीत किल्ला लढवला. त्याने २०९ चेंडूंचा सामना करत ७ सुरेख चौकारांच्या मदतीने १०२ धावांची संयमी खेळी साकारली. जाडेजाचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे १६ वे शतक ठरले. शतक पूर्ण केल्यानंतर काही वेळातच जडेजा बाद झाला आणि सौराष्ट्रचा पहिला डाव ३९२ धावांवर संपुष्टात आला. योगायोग म्हणजे जडेजाला त्याचा जुना सहकारी गोलंदाज धर्मेंद्रसिंह जडेजाने बाद केले.
प्रेरक मांकडचेही दमदार शतक, चिराग जाणीची अर्धशतकी साथ!
RAVINDRA JADEJA CELEBRATING HIS 16th FIRST CLASS HUNDRED 😍🇮🇳 https://t.co/zQKlMvCqC9
— Johns. (@CricCrazyJohns) October 12, 2026
केवळ रवींद्र जडेजाच नव्हे, तर सौराष्ट्रकडून प्रेरक मांकडनेही उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. प्रेरकने १५० चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकारासह १२९ धावांची वादळी शतकी खेळी उभारली. या दोघांशिवाय मधल्या फळीत चिराग जाणीने १४८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या तीन प्रमुख खेळाडूंच्या दमदार खेळीमुळे सौराष्ट्रने मोठी धावसंख्या उभारली.
देव आदित्य सिंहचे ५ विकेट्स; छत्तीसगडसमोर ३९२ धावांचे आव्हान!
छत्तीसगडच्या गोलंदाजांचा विचार करता वेगवान गोलंदाज देव आदित्य सिंहने प्रभावी मारा करत २४ षटकांत ६७ धावा देऊन ५ महत्त्वाचे विकेट्स घेतले. रुद्र प्रताप आणि धर्मेंद्रसिंह जडेजा यांनी प्रत्येकी दोन, तर संदीप वॉरियरने एक गडी बाद केला. आता पहिल्या डावात ३९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना छत्तीसगडचा संघ कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





