पुणे : राज्यातील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याचा आरोप रविकांत तुपकर यांच्यावर करण्यात आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष जालिंदर जाधव यांनी ही कारवाई केली होती. रविकांत तुपकरांनी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची केली स्थापना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर रविकांत तुपकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा केली आहे. येत्या विधानसभेमध्ये रविकांत तुपकर महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीच्या माध्यमातून 25 जागा लढवणार आहेत. 25 जागांमध्ये बुलडाणा जिल्हयातील 6 जागांचा समावेश आहे. तसेच लवकरच राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी यावेळी जाहीर केले. कोण आहेत रविकांत तुपकर ? रविकांत तुपकर हे महाराष्ट्रातील राजकारणी व चळवळीचे अग्रणी नेते आहेत. ते मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते आहेत तसेच ते महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता.