#INDvENG Test Series : डीआरएसवरून अश्विनची पंतवर टीका

नवी दिल्ली – इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने 32 बळी घेतले. मात्र, त्याने केलेली अपील अनेकदा चुकीचे ठरले. यासाठी अश्विनने आपण एकटेच दोषी नसून यष्टीरक्षक ऋषभ पंत हा देखील दोषी असल्याचे सांगून नवा वाद निर्माण केला आहे.
प्रत्येक गोलंदाजांला यष्टीरक्षकाकून महत्त्वपूर्ण सल्ला मिळतो व त्यानंतरच तो गोलंदाज किंवा कर्णधार डीआरएसची मागणी करतो. कसोटी मालिकेत अनेकदा असे अपील केले गेले जे पंचांनी फेटाळून लावले. त्यावेळी डीआरएस घ्यायचा की नाही ते पंतकडून कळणे गरजेचे होते मात्र, तोच संभ्रमात असल्याचे अनेकदा दिसून आले, असेही अश्विनने सांगितले आहे.
मी व कर्णधार विराट कोहलीने घेतलेले अपीलसाठीचे डीआरएस रिव्ह्यू अनेकदा चुकीचे ठरले. याबाबत सुधारणा होणे आवश्यक आहे पण त्यात यष्टीरक्षकाचा सल्ला मोलाचा असतो. पंत याचबाबतीत कमी पडत आहे. कोणत्याही गोलंदाजाने अपील केले तर यष्टीरक्षकाला चेंडूची दीशा व टप्पा अन्य खेळाडूंपेक्षा लवकर समजतो.
पंतने पुढील काळात यावर लक्ष दिले तर गोलंदाजांना जास्त फायदा होइल. जे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यष्टीमागे करत होता ते कौशल्य पंतनेही विकसित केले पाहिजे, अशी अपेक्षाही अश्विनने व्यक्त केली.





