Ravichandran Ashwin : आर अश्विनने रचला इतिहास! BBL मध्ये सामील होणारा ठरला पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू

Ravichandran Ashwin to play in BBL : भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती. आता तो पुन्हा खेळताना दिसणार आहे, मात्र परदेशी लीग्समध्ये दिसेल. याच पार्श्वभूमीवर, अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या बिग बैश लीग (BBL) मधील सिडनी थंडर संघाशी करार केला आहे.
यामुळे तो बीबीएलमध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. 39 वर्षीय रविचंद्रन अश्विन 14 डिसेंबर 2025 ते 25 जानेवारी 2026 या कालावधीत होणाऱ्या बिग बॅश लीगच्या दुसऱ्या टप्प्यात सिडनी थंडरसाठी उपलब्ध असणार आहे.
रविचंद्रन अश्विन काय म्हणाला?
Welcome to Western Sydney, @ashwinravi99 ⚡️ pic.twitter.com/RaIvaVUgAf
— Sydney Thunder (@ThunderBBL) September 25, 2025
सिडनी थंडरशी करारानंतर रविचंद्रन अश्विन म्हणाला, “सिडनी थंडरशी माझी चर्चा अतिशय सकारात्मक झाली. त्यांनी माझ्या भूमिकेबाबत पूर्णपणे सहमती दर्शवली आहे. मला डेव्हिड वॉर्नरचा खेळ खूप आवडतो. मी संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करण्यास उत्सुक आहे.” सिडनी थंडरचे महाव्यवस्थापक ट्रेंट कोपलँड यांनी या कराराला बीबीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा करार संबोधले. ते म्हणाले, “हा बीबीएलच्या इतिहासातील कदाचित सर्वात मोठा करार आहे. अश्विन हे क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांच्यात प्रचंड स्पर्धात्मकता आहे.”
बीबीएलमधील सहभागी होणारा पहिला भारतीय खेळाडू –
Lightning then the Thunder. Now Down Under ⚡💚 @ThunderBBL pic.twitter.com/sFfG8eqCZs
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) September 25, 2025
रविचंद्रन अश्विन हा बीबीएलमध्ये खेळणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी भारतात जन्मलेला उन्मुक्त चंद आणि निखिल चौधरी यांनी परदेशात स्थलांतर केल्यानंतर बीबीएलमध्ये भाग घेतला होता. अश्विनने यूएईच्या आयएल टी-20 लीगच्या लिलावातही सहभाग घेतला आहे. आयएल टी-20 4 जानेवारी 2026 रोजी संपल्यानंतर तो बीबीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सिडनी थंडरशी जोडला जाणार आहे.
हेही वाचा – IND A vs AUS A : शतकापूर्वी केएल राहुलच्या अचानक मैदान सोडण्याने चाहत्यांमध्ये खळबळ! नेमकं कारण काय?
बीसीसीआय भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही, जोपर्यंत ते राष्ट्रीय संघ किंवा आयपीएलशी संबंधित असतात. मात्र, आता निवृत्ती घेतल्याने अश्विनला परदेशी लीगमध्ये खेळण्याची मुभा मिळाली आहे. अश्विनच्या या नव्या प्रवासाला पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सिडनी थंडरसाठी त्यांची कामगिरी बीबीएलमध्ये नवा इतिहास रचेल, अशी अपेक्षा आहे.





